मुंबई - शहराच्या पूर्व उपनगरातील विकास हायस्कुलमध्ये गेल्या ४ वर्षांपासून होळी आणि रंगपंचमीच्या पार्श्वभूमीवर प्रबोधनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. याकार्यक्रमात पाणी आणि विषारी रंगाचा वापर करू नका, असे सांगितले जाते. त्यामुळे विद्यार्थीही आता पिचकारी आणि रंग खरेदीसाठी हट्ट करत नाहीत.
रंगपंचमीमध्ये वापरलेले जाणारे विषारी रंग आणि पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी शालेय स्तरावर प्रबोधन केले जाते. त्यामुळे आता मुले रंगपंचमीमध्ये पिचकारी आणि रंगाचा कमी प्रमाणात वापर करतात. उलट आता विद्यार्थी रंगपंचमीमध्ये रंग वापरायल नको, पुरणपोळी बनवा असे सांगतात, असे यावेळी काही पालकांनी सांगितले .
संस्थाचालक प. म. राऊत यांच्या आदेशानुसार मागील ४-५ वर्षांपासून होळी आणि रंगपंचमी सणाबद्दल जनजागृती करत आहोत. काही वर्षांपूर्वी होळीच्या दोन दिवस अगोदर मुले शाळेत रंग आणि फुगे घेऊन यायचे. मात्र, जेव्हापासून शाळेत प्रबोधन सुरू झाले. तेव्हापासून शाळेत हे चित्र बदलले आहे, असे प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापकांनी सांगितले.