मुंबई - मुंबईत सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्याप्रमाणात वाढला आहे. हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुंबई महापालिका प्रशासनाकडून नागरिकांना लस घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. यासाठी पालिकेने शहरातील प्रत्येक वार्डामध्ये लसीकरण केंद्र सुरू केले आहे. मात्र, भाजप नगरसेविकेच्या वार्डातील लसीकरण केंद्रावर चक्क लसीकरणाची मोहीम बंद ठेऊन लग्नसोहळा पार पाडला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
भाजपा नगरसेविका सुरेखा पाटील यांच्या वार्डातील प्रकार
कांदिवलीमधील लोंखडवाला येथील वार्ड क्रंमाक २७ मध्ये भाजपाच्या सुरेखा पाटील या नगरसेविका आहेत. पाटील यांनी १२ मे ला आपल्या वार्डामध्ये अलिका नगर येथे कोरोना प्रतिंबधात्मक लसीकरण केंद्राचे उद्घघाटन केले. या लसीकरण केंद्रावर दररोज २०० जणांचे लसीकरण केले जाईल, असे भाजपा नगरसेविका पाटील यांनी बॅनर लावून जाहीर केले होते.
लसीकरण केंद्र बंद विवाह सोहळा सुरू-
मुंबईतील काही नागरिकांना आरोग्य सेतु आणि कोविन अॅपच्या माध्यमातून लसीकरणासाठी या केंद्रावरील दुपारी दोनची वेळ मिळाली होती. अॅपवर झालेल्या नोंदणीनुसार नागरिक लसीकरण केंद्रावर दाखल झाले. मात्र, या ठिकाणी लसीकरण बंद ठेऊन विवाहसोहळा सुरू असल्याचा प्रकार या नागरिकांना पाहायला मिळाला.
लसीकरण केंद्रावर विवाहसोहळा सुरू असल्याचे पाहून लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांध्ये संताप निर्माण झाला. कारण, या ठिकाणी काही नागरिक बोरवलीहून लस घेण्यासाठी आले होते. मुळात स्लॉट बुक करण्यासाठीच नागरिकांना मोठी कसरत करावी लागत आहे. त्यातून ज्या ठिकाणी स्लॉट मिळाला. त्या ठिकाणी नागरिक लस घेण्यासाठी दाखल झाले असता, अलिका नगरातील या लसीकरण केंद्रामध्ये विवाह सोहळा सुरू होता. या नागरिकांनी तिथे विचारपूस केली, असता त्यांना दुसऱ्या दिवशी येण्याचा सल्ला देण्यात आल्याचे एका ज्येष्ठ महिलेने सांगितले.
कारवाईची मागणी-
अलिका नगरातील हॉलमध्ये सुरू करण्यात आलेल्या लसीकरण केंद्रामध्ये विवाह सोहळा सुरू असल्याने लस घेण्यासाठी लांबून आलेल्या नागरिकांनी संताप व्यक्त केला. लोक लस घेण्यासाठी लॉकडाऊनमध्ये लांबून येतात आणि या ठिकाणी अशा प्रकाराला सामोरे जावे लागत आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन मुंबई महापालिका प्रशासनाने कारवाई करावी अशी मागणी लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांनी केली आहे.