मुंबई - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी पीक विम्यावरुन विमा कंपन्यांच्या मुंबईतील कार्यालयांना लक्ष केल्याचे पडसाद बुधवारी विधानसभेत उमटले. पुरवणी मागण्यांवर बोलताना आमदार भास्कर जाधव म्हणाले, पीक विमा कंपन्यांची कार्यालये गेली ५ वर्षे मुंबईत आहेत. हे ५ वर्षांनी उद्धव ठाकरे यांना कळले काय? चला कधी जाताहेत विमा कंपन्यांची कार्यालये फोडायला? मी पण सोबत येतो, असा टोला त्यांनी शिवसेनेला लगावला.
यावेळी विधानसभेत सेना-राष्ट्रवादीच्या आमदारांमधे पीकविम्यावरुन तू तू-मैं मैं झाली. आमदार अजित पवारांनीही पीक विमा कंपन्यांची कार्यालये उद्धव ठाकरे यांना मुंबईत असल्याचे आता कळाले काय? असे म्हणाले. तर आमदार छगन भुजबळ चर्चेत सहभागी होत, मीही विमा कंपनीची कार्यालये फोडायला येतो, असा टोला लावला. मात्र, यावर शिवेसेना आमदार अजय चौधरींनी आक्षेप घेतला.
एकंदरीतच या फोडाफोडीच्या चर्चेने विधानसभेत वाद झाला आणि हास्यही उमटले. आमदार भुजबळ आणि भास्कर जाधव हे पुर्वाश्रमीचे शिवसैनिक असल्याने फोडाफोडीची चर्चा चांगलीच रंगली होती.