मुंबई : शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मंगळवारी विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधक आक्रमक झाले होते. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे. विरोधक आज पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या वीज प्रश्नावर आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. शेतकऱ्यांची वीज तोडणी सरकारने केली आहे. तसेच घरगुती गॅस दरवाढ करण्यात आली आहे. यावरून विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी घोषणाबाजी करत सरकारचा निषेध केला.
आशिष शेलारांची राऊंतांवर टीका : खासदार संजय राऊत यांनी कोल्हापुरात शिंदे गटावर टीका करताना ते विधिमंडळ नाही, तर ४० जणांचे चोरमंडळ असल्याची टीका केली होती. या वक्तव्याचे पडसाद आता विधानसभेत उमटले आहेत. त्यांच्याविरोधात सत्ताधारी आक्रमक झाले आहेत. भाजप आमदार आशिष शेलार यांनी विधानसभेत राऊतांचा समाचार घेतला आहे. शिवसेना खासदार, संजय राऊत यांनी विधान भवनावरच टीका करत विधान भवन एक चोर आहे असे सांगितले आहे. यावर भाजप नेते मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी संजय राऊत यांच्यावर सडकून टीका केली आहे.
विधानभवनाचा अपमान : याप्रसंगी संजय राऊत यांच्याविषयी बोलताना आशिष शेलार म्हणाले की, एका हिंदी सिनेमाचं प्रसिद्ध गाणे आहे, चोरों को सभी नजर आते है चोर. मी संजय राऊत यांचे नैराश्य, वैफल्य ग्रस्थ समजू शकतो, त्यांच्या मनावर फार परिणाम झाला आहे. ज्यांचे हात मराठी माणसाच्या घराच्या चोरीमध्ये लपलेले आहेत. त्यांच्याकडून अजून काय अपेक्षा करू शकतो. हा महाराष्ट्राचा अपमान आहे. सर्व आमदारांचा अपमान आहे. विधानभवनाचा अपमान आहे.
सामान्य नागरिक बेहाल : वाढत्या महागाईचा फटका सामान्य नागरिकांना बसत आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात त्याचे गंभीर पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे. घरगुती गॅस सिलेंडरचे दर पन्नास रुपये, तर व्यावसायिक गॅस सिलेंडरचे जवळपास साडेतीनशे रुपये वाढल्याने याचा थेट फटका सामान्य नागरिकांना बसणार आहे. या दरात झालेल्या वाढीमुळे आता सामान्य नागरिकांना हॉटेलमध्ये जाऊन चहा देखील पिता येणार नाही, अशी परिस्थिती झाली आहे. चहाचे दर देखील वाढतील, अशी भीती आता सामान्य नागरिक व्यक्त करत आहे. केंद्र सरकारने सामान्य नागरिकांना बेहाल केले आहे.
दोन्ही सभागृहात आवाज उठवू : याच्या विरोधात आम्ही अर्थसंकल्पीय अधिवेशनात दोन्ही सभागृहात आवाज उठवू, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री जयंत पाटील यांनी विधान भवन परिसरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना दिला. तसेच राज्यातील शेतकऱ्यांची विज तोडणी बेकायदेशीरपणे राज्य सरकार करत आहे. सत्तेत नसताना शेतकऱ्यांना वीज मोफत करून द्या, अशी मागणी करणारे आज सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्यांची वीज तोडत आहेत असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला आहे.
सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी : अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी सर्वच विरोधी पक्ष आक्रमक झालेली पाहायला मिळाले. महाविकास आघाडीमधील तिन्ही पक्षाचे ज्येष्ठ नेते यांनी विधानभवनाच्या पायऱ्यावर तिसऱ्या दिवशी दिवसाच्या सुरुवातीलाच राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी दिली. सिलेंडरचे वाढते दर, शेतकऱ्यांची वीज तोडणी आणि कांद्याच्या दरावरून पुन्हा एकदा राज्य सरकारच्या विरोधात महाविकास आघाडीच्या नेत्यांनी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवसाच्या सुरुवातीलाच विधानभवनाच्या पायऱ्यावर जोरदार घोषणाबाजी केलेली पाहायला मिळाली.
स्मृती इराणी गॅस दरवाढीवर गप्प का? केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी केंद्रात सत्तेत येण्याआधी गॅस सिलेंडरच्या वाढत्या दरावरून रस्त्यावर उतरून जोरदार आक्रोश केलेला सर्वांनीच पहिला. मात्र आता त्या वाडीवर काहीही बोलत नाहीत. स्मृती इराणी आता गॅस दरवाढीवर गप्प का? सामान्य नागरिकांची होणारे हाल आता त्यांना दिसत नाही का, असा थेट सवाल काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या यशोमती ठाकूर यांनी विचारला आहे.