मुंबई - महाराष्ट्र राज्याला कोरोना लसींचा मूलभूत साठा हा प्राप्त झाला आहे. मात्र, नागरिकांमध्ये केंद्र सरकारविरोधात रोष उत्पन्न करण्यासाठी ठाकरे सरकार जाणून बुजून सामान्य नागरिकांना लस उपलब्ध करून देत नसल्याचा गंभीर आरोप विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे. तसेच कोरोनाच्या मुद्द्यावरून राजकारण होता कामा नये, मात्र ठाकरे सरकार केंद्र सरकारला बदनाम करण्यासाठी जाणीवपूर्वक कट आखून काम करत असल्याची टीकाही प्रवीण दरेकर यांनी केली आहे.
विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी पत्रकार परिषदे घेत गंभीर आरोप केले आहेत. यावेळेस त्यांनी केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला लसींचा अपेक्षित पुरवठा होत नसल्याचे सर्व आरोप फेटाळून लावले आहे. एकीकडे राज्य सरकार बोलत आहे की, महाराष्ट्रात सर्वाधिक लसीकरण केल्याचा दावा करते 30 लाख नागरिकांना लसीचे दोन डोस मिळाल्याचे सांगत आहे, मग या लसी केंद्र सरकारने दिल्याशिवाय मिळाल्या का? असा सवालदेखील यावेळेस प्रवीण दरेकर यांनी उपस्थित केला आहे.
'मुंबई महापालिकेच्या आयुक्तांनी मर्यादेत राहून बोलावे'
पत्रकार परिषदेत प्रवीण दरेकर यांनी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल सिंग चहल यांना खडे बोल सुनावले आहेत. सुरुवातीला आयुक्त आम्हाला भेटायला तयार नव्हते. मात्र आम्ही आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर दुपारी साडेतीन वाजता ते आम्हाला भेटायला तयार झाल्याचे प्रवीण दरेकर यांनी सांगितले आहे. तसेच लॉकडाऊनचा निर्णय हा राज्यांवर सोडावा या इक्बाल सिंग चहल यांच्या वक्तव्याचा त्यांनी समाचार घेतला. केंद्र सरकारने देशव्यापी लॉकडाऊनचा निर्णय घेतला तर तो पाळणे सर्व राज्यांना क्रमप्राप्त आहे. आयुक्त हे केंद्र सरकारच्यावर नाही आहेत, त्यामुळे त्यांनी मर्यादेत राहून बोलावे, असे खडे बोलही यावेळी प्रवीण दरेकर सुनावले आहे.
हेही वाचा -'देशातील कोरोनाच्या स्थितीसाठी संपूर्णपणे मोदीच जबाबदार'