मुंबई - भाजप नेते किरीट सोमय्या यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल (Kirit Somaiya Viral Video) झाल्यानंतर याचे पडसाद आज विधिमंडळात दिसून आले. विधान परिषदेत विरोधकांनी हा मुद्दा लावून धरला. अखेर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी सखोल चौकशी करण्याचे आश्वासन दिले.
महिलांना ब्लॅकमेल करण्याचे काम - किरीट सोमय्या यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल केल्यानंतर याचे पडसाद आज विधान परिषदेतसुद्धा उमटले. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी प्रश्नोत्तराच्या तासानंतर हा मुद्दा उपस्थित केला. या प्रसंगी बोलताना दानवे म्हणाले की, केंद्राची सुरक्षा घेऊन महिलांना ब्लॅकमेल केले जात आहे. ८ तासाचे व्हिडिओ आहेत. मी सभापतींना देणार आहे. ही व्यक्ती महाराष्ट्रद्रोही आहे. आपले सरकार नैतिकतेबद्दल बोलते. पण किरीट सोमय्या यांच्यासारखे दलाल महाराष्ट्रात महिलांवर अच्याचार करत आहेत. त्यांच्यावर आता सरकार काय कारवाई करणार? माझ्याकडे त्यांचे किळसवाणे पेन ड्राईव्ह आहे. त्यातील दृश्य बघू शकत नाही. त्यात घाणेरडे शब्द आहेत, असे सांगत दानवे यांनी तो पेन ड्राईव्ह सभापतींना दिला.
आम्ही भोगले आहे - या विषयावर बोलताना ठाकरे गटाचे नेते आमदार, अनिल परब म्हणाले की, माजी खासदाराचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. कोणाच्या राजकीय आयुष्यात बदनामी काय असते, खोटे आरोप जेव्हा एखाद्या माणसावर केले जातात तेव्हा काय होते ते आम्ही भोगले आहे. ज्या माजी खासदाराचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे, त्याची चौकशी लावा. उपमुख्यमंत्री सभागृहात आहेत त्यांना जी काही मोठ्यातली मोठी चौकशी लावायची आहे ती लावा. आता हे शोधणे सरकारचे काम आहे. ती महिला कोण आहे हे जनतेला समजलेच पाहिजे. हा प्रकार अतिशय गंभीर आहे. याबाबत एसआयटी लावा. त्यांनी जो खुलासा केला आहे त्यात हा व्हिडिओ बनावट आहे असे कुठेच म्हटले नाही. त्यांची सुरक्षा काढून घेण्याची मागणीसुद्धा परब यांनी केली आहे.
सखोल व वरिष्ठ स्तरावर चौकशी - विरोधकांनी किरीट सोमय्या यांच्या मुद्द्यावर उपस्थित केलेल्या प्रश्नाला गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले आहे. फडणवीस म्हणाले आहेत की, हा विषय अतिशय गंभीर आहे. राजकारणात असे प्रसंग येतात ज्याने माणसाचे संपूर्ण आयुष्य पणाला लागते. तुमच्याकडे काही माहिती असेल तीसुद्धा द्या. या संदर्भात बिलकुल काळजी करू नका. याची अतिशय सखोल व वरिष्ठ स्तरावर चौकशी केली जाईल.
ठाकरे गटाच्या महिला शिवसैनिक आक्रमक - किरीट सोमय्या यांचा कथित आक्षेपार्ह व्हिडिओ समोर आल्यानंतर ठाकरे गटाच्या महिला शिवसैनिक आक्रमक झाल्या आहेत. पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर चौकात किरीट सोमय्या यांच्या प्रतिमेला शेन लावून जोडे मारत निषेध व्यक्त करण्यात आला आहे. यावेळी आक्रमक शिवसैनिकांच्यावतीने किरीट सोमय्या यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. ही लाजीरवाणी बाब आहे. हे किती घाणेरडे वृत्तीचे आहे हे आता सर्व जनतेला समजले आहे. आता भाजपच्या महिला आघाडी तसेच त्यांच्या महिला नेत्या चित्रा वाघ कुठे आहेत? असा प्रश्न महिला शिवसैनिकांनी विचारला आहे.
हेही वाचा -
- Kirit Somaiya Video Case : किरीट सोमय्या यांच्या कथित आक्षेपार्ह व्हिडिओची होणार सखोल चौकशी - देवेंद्र फडणवीस
- Kirit Somaiya Viral Video : किरीट सोमैयांविरोधात महिला शिवसैनिक आक्रमक; प्रतिमेला शेण लावत केला निषेध
- Maharashtra Monsoon Session 2023: अमली पदार्थाच्या प्रमाणावर निर्बंध उपमुख्यमंत्र्यांनी सभागृहात सांंगितला प्लॅऩ