मुंबई - मुंबईत कोरोनाचा प्रसार होत असल्याने रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. रुग्णसंख्या वाढत असल्याने आयसीयू आणि व्हेंटिलेटर बेडची कमतरता जाणवत आहे. मुंबईत आयसीयूचे 50, व्हेंटिलेटरचे फक्त 21, तर 666 ऑक्सिजनचे बेड रिक्त आहेत. यामुळे आयसीयू, व्हेंटिलेटरच्या बेडसाठी रुग्णांच्या नातेवाईकांना वणवण फिरावे लागत आहे. यासाठी लवकरच 4 जम्बो कोविड सेंटर उभारली जाणार आहेत. त्यात 5 हजार 300 बेड आणि 800 आयसीयू सुविधा उपलब्ध करून दिली जाणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.
हेही वाचा - दिवे पेटवले, ताट वाजवली, त्यावेळेसचे लॉकडाऊन योग्य होत का? नाना पटोले यांच्या भाजपला कानपिचक्या
आयसीयू, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन बेडचा तुटवडा
20 एप्रिलच्या आकडेवारीनुसार जम्बो कोविड सेंटर आणि इतर कोविड सेंटरमध्ये एकूण 28 हजार 801 खाटा आहेत. त्यापैकी 22 हजार 144 खाटांवर रुग्ण असून 6 हजार 657 खाटा रिक्त आहेत. पालिका सरकारी रुग्णालयात 21 हजार 93 खाटा आहेत. त्यापैकी 17 हजार 471 खाटांवर रुग्ण असून 3 हजार 622 खाटा रिक्त आहेत. ऑक्सिजनच्या 10 हजार 511 खाटा आहेत. त्यापैकी 9 हजार 845 खाटांवर रुग्ण असून 666 खाटा रिक्त आहेत. आयसीयूच्या 2 हजार 798 खाटा आहेत. त्यापैकी 2 हजार 748 खाटांवर रुग्ण असून 50 आयसीयू बेड रिक्त आहेत. व्हेंटिलेटरच्या 1 हजार 426 खाटा आहेत. त्यापैकी 1 हजार 405 बेडवर रुग्ण असून 21 बेड रिक्त आहेत. मुंबईत आयसीयूच्या आणि व्हेंटिलेटरच्या खाटा कमी प्रमाणात रिक्त आहेत. मात्र, कोविड सेंटर, पालिका रुग्णालय, सरकारी रुग्णालयात सुमारे 10 हजार खाटा रिक्त आहेत, त्यात ऑक्सिजनच्या 666 खाटा रिक्त आहेत.
ऑक्सिजनचा तुटवडा
मुंबईत रुग्ण वाढत असल्याने ऑक्सिजनची आवश्यकता भासत आहे. ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे गेल्या आठवड्यात दोन दिवसांत ६ रुग्णालयातील १६८ रुग्णांना हलवण्यात आले आहे. असा प्रकार पुन्हा घडू नये म्हणून पालिकेला प्रतिदिन देण्यात येत असलेला २३५ मेट्रिक टन ऑक्सिजनचा साठा कमी करण्यात येऊ नये. ऑक्सिजन उत्पादन स्थळापासून त्याची वाहतूक आणि मुंबईतील सर्व कोरोना रुग्णालये व कोरोना केंद्र, तसेच इतर रुग्णालयांमध्ये देखील त्याचे वितरण होईपर्यंतच्या सर्व बाबींवर देखरेख करण्यासाठी महानगरपालिकेची पथके नेमण्यात येतील. ही पथके रुग्णालयांना दररोज प्राप्त झालेला प्राणवायू साठा किती, त्याची माहिती गुगल ड्राईव्हमध्ये अद्ययावत करतील. त्यामुळे, दररोज किती प्राणवायू मुंबईतील रुग्णालयांमध्ये उपलब्ध होतो, त्यावर देखरेख करता येईल, अशी सूचना पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी केली. विशाखापट्टणम, जामनगर आणि रायगड या तिन्ही ठिकाणांहून मिळून सुमारे ५०० टन अधिकचा ऑक्सिजनचा साठा लवकरच उपलब्ध होण्याची अपेक्षा असून त्यानंतर सर्वांनाच दिलासा मिळेल, असेही चहल यांनी म्हटले.
रेमडेसिवीरचा मुबलक साठा
कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी रेमडेसिवीर इंजेक्शनचा वापर केला जातो. त्यामुळे, या इंजेक्शनचा राज्यात तुटवडा आहे. मुंबईतही अनेक ठिकाणी या इंजेक्शनचा काळाबाजार सुरू आहे. यामुळे खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांना वणवण भटकावे लागत आहे. मात्र, मुंबई महापालिकेकडे 22 हजार रेमडेसिवीर इजेक्शनचा साठा आहे. 2 लाख इंजेक्शनची ऑर्डर देण्यात आली आहेत.
86 हजार 410 सक्रिय रुग्ण
मुंबईत कोरोनाग्रस्तांचा आकडा 5 लाख 93 हजार 906 वर पोहचला आहे. मृतांचा आकडा 12 हजार 439 वर, तर रुग्ण बरे होण्याची संख्या 4 लाख 96 हजार 263 वर पोहचली आहे. मुंबईत सध्या 83 हजार 934 सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 84 टक्के असून रुग्ण दुप्पटीचा कालावधी 47 दिवस इतका आहे. मुंबईत कोरोना रुग्ण आढळून आलेल्या 105 चाळी आणि झोपडपट्ट्या कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. तर, 1 हजार 141 इमारती रुग्ण आढळून आल्याने सील करण्यात आल्या आहेत. कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी आतापर्यंत 50 लाख 27 हजार 882 चाचण्या करण्यात आल्या आहेत.
हे विभाग हॉटस्पॉट
मुंबईत अंधेरी, मालाड, कांदिवली, बोरिवली व गँन्टरोड आदी विभाग कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले आहेत. या विभागात सर्वाधिक कोरोना रुग्ण आहेत. यामुळे या विभागात कोरोना नियमांची कडक अंमलबजावणी महापालिकेने सुरू केली आहे.
19 लाख 69 हजार लाभार्थ्यांना लस
मुंबईत 20 एप्रिलपर्यंत 20 लाख 43 हजार 898 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. त्यात 17 लाख 66 हजार 975 लाभार्थ्यांना पहिला, तर 2 लाख 76 हजार 923 लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला. आतापर्यंत एकूण 2 लाख 68 हजार 273 आरोग्य कर्मचारी, 3 लाख 2 हजार 275 फ्रंटलाईन वर्कर, 7 लाख 85 हजार 724 जेष्ठ नागरिक, तर 45 ते 59 वर्षांमधील गंभीर आजार असलेल्या 6 लाख 87 हजार 626 लाभार्थ्यांना लस देण्यात आली.
हेही वाचा - राज्यात 67 हजार 468 नवे कोरोनाग्रस्त, 568 जणांचा मृत्यू