मुंबई - लॉकडाऊनच्या काळात अनेकांचे रोजगार गेले आहेत. त्यामुळे भामट्यांद्वारे ऑनलाईन आर्थिक फसवणूकीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. सायबर गुन्हेगारांकडून भारतातील नागरिकांना लुटण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमांचा वापर केला जात आहे. यात विशेषकरून 'कौन बनेगा करोडपती'सारख्या लोकप्रिय मालिकेचा आधार घेत फोन करून लुटले जात असल्याचेही समोर आले आहे. सायबर पोलिसांच्या माहितीनुसार अशा प्रकाराचे गुन्हे भारताच्या शेजारील राष्ट्रातील काही सायबर गुन्हेगार करत आहेत.
कशा प्रकारे होत आहे फसवणूक?
भारतातील अनेक नागरिकांना गेल्या काही दिवसापासून त्यांच्या मोबाईल क्रमांकावर +९२ या अंकाने सुरू होणाऱ्या क्रमांकावरून कॉल, व्हॉट्सअॅप मेसेज किंवा एसएमएस येत आहेत. सदर कॉलवरील व्यक्ती सांगते की, 'तुम्हाला कौन बनेगा कोरोडपती या सुप्रसिद्ध खेळामध्ये काही रकमेचे पारितोषीक मिळाले आहे. संबंधित रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा करायची आहे. मात्र, त्यासाठी तुमच्या बँक खात्याचे तपशीलाची आवश्यकता आहे'. अशाच आशयाचा संदेश व्हॉट्सअॅप किंवा एसएमएसवर येतो व त्यात लिंक दिलेली असते. त्या लिंकवर क्लिक केल्यास एक फॉर्म भरायला सांगितला जातो. त्यामध्ये तुमच्या बँक खात्याचा तपशील मागितला जातो. या नंतर पीडित व्यक्तीच्या मोबाईल क्रमांकावर आलेला ओटीपी (OTP) विचारला जातो. पीडित व्यक्तीकडून ओटीपी मिळताच त्याच्या बँक खात्यात असलेली सर्व रक्कम परस्पर काढून घेण्यात येते. गेल्या काही दिवसांमध्ये अशा अनेक घटना समोर आल्या आहेत.
फसवणुकीपासून कसे वाचवाल स्वत:ला?
तुमच्या मोबाईल क्रमांकावर जर +९२ या किंवा +९१ सोडून इतर अंकांनी सुरू होणाऱ्या मोबाईल क्रमांकावरून फोन आल्यास उचलू नका. याबरोबरच अशाच क्रमांकावरून येणाऱ्या मेसेजमधील लिंकवर क्लिक करू नका. कोणत्याही अनोळखी व्यक्तीला आपले बँक खात्याची माहिती देऊ नका. असे फोन कॉल्स येत असतील तर लगेच सायबर पोलिसांना याची माहिती द्या.