मुंबई - गेल्यावर्षी 4 ऑक्टोबरला कत्तल मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून (एमएमआरसी) रात्रीच्या अंधारात आरेतील काही झाडांची बेकायदा करण्यात आली. आज (रविवार) या घटनेला एक वर्षे पूर्ण झाले. पण, आजही या दुर्दैवी घटनेच्या कटू आठवणी आणि हे कृत्य करणाऱ्या सरकारी यंत्रणांविरोधात प्रचंड राग आदिवासी-पर्यावरण प्रेमींमध्ये कायम असल्याचे चित्र आहे. त्यातून आज आरेत आदिवासी - पर्यावरण प्रेमींनी झाडांना अनोख्या पद्धतीने श्रद्धांजली वाहत आरेसाठीचा लढा असाच पुढे सुरू ठेवण्याची शपथ घेतली.
कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो 3 प्रकल्पातील कारशेड आणि इतर काही विकास प्रकल्पाच्या नावाखाली मुंबईचे फुफ्फुस म्हणून ओळखले जाणारे आरे जंगल नष्ट केले जाणार असल्याचे म्हणत सेव्ह आरे चळवळ उभी राहिली. या चळवळीद्वारे रस्त्यावरची आणि न्यायालयीन लढाई सुरू आहे. या लढाईला यश आले असून अर्धी लढाई त्यांनी जिंकलीही आहे. कारण मेट्रो 3 कारशेड आरेतून बाहेर फेकण्यात आले आहे. तर, आरेतील 800 एकर जागा वन क्षेत्र म्हणून राखीव करण्यात आली आहे. महत्वाचे म्हणजे, ज्या 29 आंदोलकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले होते, ते गुन्हेही नुकतेच मागे घेण्यात आले आहेत. मात्र, तरीही जोपर्यंत संपूर्ण 3 हजार एकर आरे संरक्षित क्षेत्र म्हणून घोषित होत नाही, तोपर्यंत लढा सुरूच राहील असा निर्धार सेव्ह आरेचा आहे.
आरेतील काही झाडांची रात्री कत्तल करण्यात आली होती, त्याला आज एक वर्षे पूर्ण झाले आहे. रात्रीच्या अंधारात झाडांची कत्तल होत असल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि काही वेळातच आदिवासी-पर्यावरण प्रेमी, सर्वसामान्य मुंबईकर शेकडोंच्या संख्येने आरेत दाखल झाला. त्यांनी या घटनेचा तीव्र विरोध, निषेध केला. वातावरण तापले. पोलिसांनी या परिसराचा ताबा घेतला. विरोध करणाऱ्या 29 जणांना अटक करत पोलिसांनी त्यांना तुरुंगात डांबले. त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल केले. दरम्यान त्या रात्री काही वेळातच झाडांची कत्तल एमएमआरसीने थांबली. पण दुसऱ्या दिवशी आंदोलन आणखी पेटले. यात राजकीय पक्षांनी-नेत्यांनीही उड्या घेतल्या. बरेच दिवस यावरून वाद सुरू होता.
आज या घटनेला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आरेत सेव्ह आरेकडून श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. आरेतील पिकनिक पॉईंट आणि नवसाचा पाडा येथे मृत झाडांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी आदिवासी-पर्यावरण प्रेमींनी वारली चित्रकलेच्या माध्यमातून जंगल-वृक्ष संवर्धनाचा संदेश देत मृत झाडांना श्रद्धांजली वाहिल्याची माहिती आरेतील रहिवासी आणि गेल्यावर्षी अटक झालेल्या 29 पैकी एक आंदोलक प्रमिला भोईर यांनी दिली आहे. तर आरे कारशेड आरेतून बाहेर फेकण्याचा आणि 800 एकर जागा राखीव करण्याचा महत्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतल्याबद्दल त्यांचे आभार मानले. तसेच नुकतेच 29 आंदोलकावरील गुन्हे मागे घेतल्याने सेव्ह आरेच्या कार्यकर्त्यामध्ये आनंदाचे वातावरण आहे. याबाबतही मुख्यमंत्र्यांचे आभार मानण्यात आल्याचे सेव्ह आरेच्या कार्यकर्त्या अमृता भट्टाचार्य यांनी म्हटले आहे.
हेही वाचा - 'महाराष्ट्र आणि महाराष्ट्र पोलिसांना बदनाम करणारे "मराठी भैय्ये" आता माफी मागणार का?'