मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना 'ईडी'ने बजावलेल्या नोटीसीनंतर प्रवीण चौगुले या ठाण्यातील तरुणाने आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली होती. यातच आणखी एका व्यक्तीने पोलिसांना फोन करुन आत्महत्या करण्याचा इशारा दिला.
सांताक्रुझ गोळीबार येथे राहणाऱ्या 29 वर्षीय मनसे कार्यकर्त्याने पोलिसांना फोन करून आत्मदहन करण्याचा इशारा दिला. या फोननंतर शिवाजी पार्क व दादर पोलीस अलर्ट झाले आणि त्यांनी कृष्णकुंज परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त वाढवला. सदर कार्यकर्ता मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांच्या कार्यालयात असता पोलिसांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. पोलिसांच्या आणि मनसे कार्यकर्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार सदर तरुण हा मनोरुग्ण असल्याचे सांगण्यात येत आहे.