नवी मुंबई: दिघा (digha) येथील ईश्वरनगर परिसरातील आनंद नगर रोडवर ताडीमाडी केंद्रात मोठ्या आवाजात बोलत असल्याच्या शुल्लक कारणावरून एकाचा खून झाला आहे. (One killed in Tadimadi Centre). 20 वर्षीय राज उतेकर असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांनी आरोपी सोनू पांडे (वय 25) याला अटक केली असून त्याच्यावर रबाळे एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्यात भादंवि कलम 302 अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.
शुल्लक कारणावरून खून: 26 ऑक्टोबरला रात्री साडेनऊच्या सुमारास राज आपल्या दोन मित्रांसोबत ताडी पीत बसला होता. गप्पा मारत असताना राजच्या आवाजाचा त्रास झाल्याने आरोपी सोनू पांडे याने राजला हळू आवाजात बोलण्याची तंबी दिली. मात्र राजने न ऐकल्याने आरोपी सोनुने राजला शिवीगाळ करत, लाथा बुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. मारहाणीनंतर आरोपी सोनू तेथून फरार झाला.
राजच्या मित्रांनी त्याला अँब्युलन्सच्या मदतीने कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र रात्री साडेदहाच्या सुमारास डॉक्टरांनी राजला मृत घोषित केले. राजचा मित्र राजू सूर्यवंशी यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी सापळा रचत आरोपी सोनू पांडे याला अटक केली असून सोनूवर खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोनूची गुन्हेगारी पार्श्वभूमी असून तो नुकताच जेलमधून सुटून आला होता. रबाळे पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.