मुंबई - मृत आत्म्याशी बोलून वशीकरणाद्वारे पैशांचा पाऊस पाडतो, दिलेली रक्कम ही 50 पट करून देतो, असे आमिष दाखवून शेकडो जणांना फसवणाऱ्या एका भोंदूबाबाला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट 9 ने अटक केली आहे. 28 डिसेंबर रोजी मुंबईतील बांद्रा परिसरामध्ये हा आरोपी एका व्यक्तीस पैशांचा पाऊस पाडून देण्यासाठी येणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती, त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून या आरोपीला ताब्यात घेतले.
निश्वित कुमार रविराज पिल्ले (वय 36) असे अटकेत असलेल्या भोंदूचे नाव आहे. त्याने आतापर्यंत शेकडो जणांना पैशांचा पाऊस पाडून देतो, असे सांगत करोडो रुपयांना फसवलेले आहे. पोलिसांनी केलेल्या तपासात आरोपीच्या मीरा रोड येथील निवासस्थानावरून पोलिसांनी जवळपास दीड कोटी रुपयांच्या 'बच्चो का बँक' म्हणून बाजारात मिळणाऱ्या नकली बनावट नोटा जप्त केल्या आहेत. पैशांचा पाऊस पाडून देण्यासाठी पीडित व्यक्तीला विश्वास बसावा म्हणून पिल्ले हा मिरारोड येथील त्याच्या घरातील भिंतीवर 500 व 2 हजार रुपयांच्या नकली नोटा चिटकवून दाखवत होता. मृत आत्म्यांना बोलावून आपण तुम्हाला 50 पट पैशांचा पाऊस पाडून देऊ शकतो, असे सांगत पीडित तक्रारदारांकडून लाखो रुपये उकळत होता.
हेही वाचा - 'कचऱ्यावरील खर्च करणार तीन पट कमी'
आरोपी हा स्वतः एका फायनान्स कंपनीत कामाला असून त्याच्याकडून पोलिसांनी आरबीआय व इतर मोठ्या बँकांचे कागदपत्रे हस्तगत केले आहेत. या प्रकरणी न्यायलयाकडून आरोपीला 2 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. पोलीस या प्रकरणातील आणखी 2 आरोपींचा शोध घेत आहेत.
हेही वाचा - नववर्षाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत चोख सुरक्षा बंदोबस्त; जवळपास 100 ठिकाणी नाकाबंदी