मुंबई- जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. राज्यातही कोरोनाचा विषाणू झपाट्याने पसरत आहे. त्यामुळे कोरोना विरुद्ध लढ्यासाठी आर्थिक मदत करा, असे आवाहन केंद्र तसेच राज्य सरकारनेही केले आहे. त्यानंतर अनेक उद्योजन, कलाकार, व्यापारी, यांनी आर्थिक मदतीसाठी हात पुढे केले आहेत. राज्यातील ऊर्जा विभागाच्या महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीनेही (महापारेषण) मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी एका दिवसाचे वेतन दिले आहे. सुमारे १ कोटी ५५ लाख ४३ हजार ३६१ रुपये इतकी ही रक्कम आहे, अशी माहिती महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दिनेश वाघमारे यांनी दिली आहे.
हेही वाचा- Coronavirus : इंदोरमध्ये 17 जणांना कोरोनाची लागण, बाधित रुग्णांचा आकडा 44 वर
या संदर्भातील पत्र महापारेषणकडून मंगळवारी मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात येत असलेल्या उपाययोजनांसाठी आर्थिक अडचण येऊ नये, यासाठी ही मदत देण्यात येत असल्याचे महापारेषणने स्पष्ट केले आहे. कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या भीषण परिस्थितीशी सामना करण्यासाठी सरकारकडून योग्य त्या उपाययोजना केल्या जात आहेत. महापारेषणकडूनही योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनीही महापारेषणच्या कामाचे जाहीर कौतुक केले आहे. वीजपुरवठा अखंडित व चांगल्या क्षमतेने ठेवण्यासाठी कर्मचारी परिश्रम घेत आहे. अतिउत्कृष्ट काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला योग्य बक्षीस देऊन गौरविण्यात येणार आहे, असेही वाघमारे यांनी यावेळी सांगतले.