मुंबई: भाजपाचे दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे (Late BJP leader Gopinath Munde) यांची आज जयंती, (Birth Anniversary OF Gopinath Munde ) या निमित्ताने गोपीनाथ गडावर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला भाजपा नेत्या पंकजा मुंडे (BJP leader Pankaja Munde) तसेच मुंडे कुटुंबिय उपस्थित राहणार आहेत. यावेळी त्या अर्धातासाचे मौन बाळगणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून राज्यात महापुरुषांचा अवमान होत असून त्याचा प्रतिकात्मक निषेध म्हणून हे मौन बाळगणार असल्याची त्यांनी माध्यमाला बोलताना दिली. हजारो चाहते या निमित्ताने गोपीनाथ गडावर जाऊन अभिवादन करत जुन्या आठवणींना उजाळा देत आहेत.पाहूया गोपीनाथ मुंडेंचा प्रवास.
अध्यात्मिक वारसा व शालेय जीवन : गोपीनाथ मुंडे म्हणजे राजकारणाचा कुठलाही वारसा नसताना, राजकारणात शिखर गाठणारा अद्वितीय नेता. गोपीनाथ पांडुरंग मुंडे यांचा जन्म १२ डिसेंबर १९४९ बीड जिल्ह्यातील परळी तालुक्या तील नाथरा या गावी एका सामान्य शेतकरी कुटुंबात झाला. वडील पांडुरंगराव आणि आई लिंबाबाई मुंडे हे वारकरी होते. आई आणि वडिलांसोबत मुंडे यांनी वयाच्या १४ व्या वर्षी पासून अनेक वर्षे पंढरपूरची वारी केली.त्यांच्या मनावर बालपणापासूनच आध्यात्मिक प्रभाव राहिला. त्यांची घरची परिस्थिती बेताची होती. १९६९ मध्ये त्यांचे पितृछत्र हपरले; पण आई व थोरले बंधू पंडितअण्णा यांनी त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी उचलली. भाऊ पंडितअण्णा यांनी स्वतःचे शिक्षण सोडून गोपीनाथ मुंडे यांचे शिक्षण पूर्ण केले. गोपीनाथ मुंडे यांनी शिक्षणाचे महत्व ओळखले आणि शालेय शिक्षणानंतर उच्च शिक्षणासाठी त्यांनी अंबाजोगाई गाठले. मुंडे यांच्या राजकीय प्रवासाला सुरवात झाली ती महाविद्यालयीन जीवनात. महाविद्यालयात होणाऱ्या निवडणुकांमध्ये ते किंग मेकर ठरायचे.
प्रमोद महाजन यांचे मेहुणे: गोपीनाथ यांच्याशिवाय पांडुरंग मुंडे यांना दोन मुले होती. गोपीनाथ मुंडे यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा नाथरा येथेच झाले. यानंतर त्यांनी अंबेजोगाई येथील योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालयात शिक्षण घेतले. त्यांनी वाणिज्य शाखेची पदवी घेतली. त्यांचा विवाह २१ मे 1978 रोजी प्रमोद महाजन यांच्या भगीनी प्रज्ञा महाजन यांच्यासोबत झाला. आणि मुंडे हे भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांचे मेहुणे झाले. त्यांच्या कुटुंबात पंकजा पालवे, डॉ. प्रीतम माटे आणि यशश्री मुंडे या तीन मुलींचा समावेश आहे. आमदार धनंजय मुंडे हे भाजपचे खासदार गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे आहेत. राजकारणी पंडित अण्णा मुंडे हे भाजपचे खासदार गोपीनाथ मुंडे यांचे मोठे बंधू आहेत.
महाजन मुंडे मैत्री : अंबाजोगाईला त्यांची प्रमोद महाजन यांच्याशी भेट झाली. प्रमोद महाजन यांनी गोपीनाथ मुंडेंचे नेतृत्व गुण ओळखले. आणि त्यांना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेशी जोडले. मुंडे-महाजन यांचं मैत्रीपर्व महाविद्यालयात सुरू झाले. आणि शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी ही मैत्री जपली. मुंडे-महाजन जोडीने महाराष्ट्रात भाजपचे पाय पक्के रोवले. भाजपचा वटवृक्ष केला. महाविद्यालयीन काळात होणाऱ्या निवडणुकांमध्ये गोपीनाथ मुंडे यांनी राजकारणाचे प्रार्थमिक धडे गिरवले. जनसंघामध्ये असतांना त्यांनी समाजकारण आणि राजकारण यांची मोट बांधायला सुरुवात केली. जनसंघातून भाजप वेगळा झाला.आणि गोपीनाथ मुंडेंच्या कारकिर्दीनं वेग घ्यायला सुरवात केली.
आणिबाणीत भोगला तुरुंगवास : मुंडे यांनी आणिबाणीला विरोध केला आणिबाणीतल्या तुरुंगवासात यशवंत केळकर यांच्यासारख्या संघटकाचे मार्गदर्शन त्यांना मिळाले. गोपीनाथ मुंडेंनी भारतीय जनता युवा मोर्चामधून राजकारणात प्रवेश केला. १९७८ मध्ये गोपीनाथ मुंडे पहिल्यांदा अंबाजोगाई तालुक्यातल्या उजनी गटातून जिल्हा परिषदेवर सदस्य म्हणून निवडून गेले. १९८० मध्ये रेणापूर विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून गेले. आणि त्यानंतर त्यांनी कधी मागे वळूण बघितलं नाही.
सभांना गर्दी जमविणारा नेता : महाराष्ट्रात गोपीनाथ मुंडे भारतीय जनता पक्षाचा चेहरा होते. महाराष्ट्रात एकमेव सभांना गर्दी जमविणारा नेता अशी मुंडेची ओळख होती. मुंडेच्या सभेला सर्वाधिक गर्दी होते हे पक्षाला चांगलेच माहित होते. विशेषतः वंजारी समाज हा गोपिनाथ मुंडेच्या सर्वाधिक जवळचा होता. ४० वर्षांपासुन गोपिनाथ मुंडे भारतीय जनता पक्षाशी जोडले गेले होते. सलग ३७ वर्षांपासुन निवडुन येत होते. मुंडेंचे बाळासाहेब ठाकरेंशी युती होण्यापुर्वीपासून २२ वर्ष जुने संबंध होते. गोपिनाथ मुंडे मुळात मराठवाड्यातील होते. त्यांना कोणताही राजकीय वारसा मिळालेला नव्हता. भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रात मोठं करण्याकरीता गोपिनाथ मुंडे आणि प्रमोद महाजनांनी अवघा महाराष्ट्र पिंजून काढला. पुण्यात २०१० साली १२ डिसेंबरला एका समारंभात भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी गोपिनाथ मुंडेंचा लोकनेता असा उल्लेख केला होता.
ओबीसी समाजाचे झुंजार नेते : या देशातील ओबीसी चळवळीचे गोपीनाथ मुंडे हे मोठे व झुंजार नेते होते. ओबीसींच्या संपूर्ण प्रश्नांची त्यांना उत्तम जाण होती. मंडल आयोगाने ओबीसींसाठी करून ठेवलेल्या शिफारशींचा त्यांचा चांगला अभ्यास होता. भाजपाचे नेते असल्यामुळे मुंडे यांना खुलेपणाने ओबीसी नेते म्हणून भूमिका बजावता येत नव्हती, हे वास्तवही नाकारता येत नाही. भाजपला अधिक व्यापक व मास पार्टी करण्याचे खरे श्रेय गोपीनाथ मुंडे यांना जाते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेत जाणीवपूर्वक नोंद करून ठेवलेल्या सोयी सवलती ओबीसींना मिळायलाच पाहिजेत अशी मुंडे यांची धारणा होती. ओबीसींच्या जनगणनेचे महत्त्व महाराष्ट्रातील गोपीनाथ मुंडे आणि छगन भुजबळ या दोन नेत्यांना जेवढे पटले होते. तेवढे अन्य कुणालाही पटले नव्हते. म्हणूनच या प्रश्नावर मुंडे यांनी दिल्लीत संसद हलवून सोडली होती.
कायम अन्यायाविरूध्द उभे : राजकारणात लागणारी जिद्द, आत्मविश्वास, संयम त्यांच्यात होता. नवा विचार, नवे तंत्रज्ञान आत्मसात करण्याची त्यांची तयारी होती. उपेक्षित शोषित वर्गामधे त्यांनी नवा विश्वास निर्माण केला. हे सर्व करत असताना त्यांना राजकारणात असलेली अनिश्चितता, अपयश, जिवघेणी स्पर्धा याला सामोरे जावे लागले. ऊसतोड कामगारांचे नेते म्हणून देखील गोपीनाथ मुंडेंकडे पाहिले जाते. युतीच्या कार्यकाळात मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग तयार झाला, मुंबईत उड्डाणपुलांचे जाळे निर्माण झाले त्यावेळी मुंडे उपमुख्यमंत्री होते. युतीसरकारचे हे मोठे यश मानले गेले. मुंडे-प्रमोद महाजन हे भारतीय जनता पक्ष शिवसेना युतीचे शिल्पकार म्हणून ओळखले जातात.
उपमुख्यमंत्रिपदाचा कार्यभार : मुंडे 1980 ते 2009 या काळात महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य होते. सरकारमध्ये असताना त्यांनी उपमुख्यमंत्रिपदाचा कार्यभार पाहिला. त्यांनी केलेल्या चांगल्या कामांचे कौतुक झाले. मुंडे यांची भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्रच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. डिसेंबर 2009 मध्ये त्यांची भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड झाली. 2009 मध्ये ते लोकसभेचे सदस्य म्हणून निवडून आले. मराठवाड्यातील बीडमधून लोकसभेचे खासदार बनल्यानंतर लगेचच त्यांना पहिल्या लोकसभेत भारतीय जनता पक्षाचे उपनेतेपद देण्यात आले. त्यांची संसदेच्या लोकलेखा समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली होती.
केंद्रीय मंत्री पदाची माळ : २०१४ मध्ये मे महिन्यात नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात त्यांचा समावेश झाला. परंतु हा आनंद त्यांच्या जीवनाच्या औटघटकेला ठरला. कारण त्यानंतर अवघ्या काही दिवसांमधेच दिल्लीत एका कार दुर्घटनेत ३ जून रोजी त्यांचे निधन झाले. गोपीनाथ मुंडे खऱ्या अर्थाने लोकनेते होते. ग्रामीण भागाशी त्यांची नाळ घट्ट जोडली गेली. असल्याने तळागाळातील माणसांशी त्यांचे एक अनोखे नाते निर्माण झाले होते. त्यांच्या मृत्यूपश्चात ही पोकळी कधीही न भरून येण्यासारखी आहे.