मुंबई: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या दहाव्या स्मृतिदिनानिमित्त शिवतीर्थावर मोठ्या संख्येने शिवसैनिकांनी बाळासाहेबांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यासाठी रीघ लावली आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून शिवसैनिक येथे जमायला सुरुवात झालेली आहे.
रांग लावायला सुरूवात: दरवर्षी मोठ्या संख्येने या ठिकाणी शिवसैनिक येत असतात. यंदा फूट पडल्याने याचा परिणाम होईल, अशी शक्यता होती. मात्र आजही शिवसैनिकांनी सकाळपासून येथे रांग लावायला सुरूवात केली आहे. शिवसेनेतील फुटीचा कोणताही परिणाम येथे दिसून येत नाही. शिंदे गटाकडून आमचीच खरी शिवसेना असा दावा केला जातोय.
बाळासाहेब ठाकरे यांचा आज 10 स्मृतीदिन: मात्र, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचेच खरी शिवसेना असून बाकींना आम्ही डिमांड देत नसल्याची संतप्त प्रतिक्रिया शिवसैनिकांकडून देण्यात येत आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज 10 स्मृतीदिन आहे. आजच्याच दिवशी म्हणजे 17 नोव्हेंबर 2012 रोजी बाळासाहेब ठाकरे यांचा मृत्यू झाला आणि अवघी मुंबई शांत झाली.
बाळासाहेबांचा जीवनप्रवासात अनेक वळणे: महाराष्ट्राच्या राजकारणात वादळ म्हणून ओळखले जाणाऱ्या बाळासाहेब ठाकरेंनी राज्याच्या राजकारणाला नवी दिशा दिली. मराठी माणसाच्या हक्कासाठी लढणारे व्यक्तीमत्व अशी ओळख असलेल्या बाळासाहेबांचा जीवनप्रवासात अनेक वळणे घेणारा होता. व्यंगचित्रकार म्हणून कारकिर्दीची सुरुवात करणारे बाळासाहेबांनी शिवसेना या पक्षाची स्थापना केली होती.