मुंबई - २१ तारखेला मुंबईत 'ईव्हीएम-व्हीव्हीपॅट हटवा आणि लोकशाही वाचवा', असा सर्वपक्षीय मोर्चा निघणार आहे. त्यासाठी राज्यातील प्रत्येक घरातून बॅलेट पेपरवर निवडणूका घेण्यासाठी एक फॉर्म भरुन घेण्यात येणार आहे, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी येथे सर्व विरोधीपक्षीय पत्रकार परिषदेत सांगितले.
पुढे बोलताना ते म्हणाले की, या फॉर्म्सच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातील भावना जाणून घेण्यात येणार आहेत. आणि त्यानंतर २१ ऑगस्टला निघणाऱ्या मोर्चात राज्यातील हे सर्व फॉर्म महाराष्ट्र निवडणुक आयोगाने याचा विचार करावा, म्हणून त्याच्याकडे सादर करण्यात येतील. असे राज ठाकरे यांनी सांगितेले. तसेच या मोर्चामध्ये कोणताही राजकीय पक्षाचा झेंडा राहणार नाही, असे राज यांनी स्पष्ट केले. जनता ही सार्वभौम असून आमची ही फक्त सुरुवात आहे. या लोकसभा निवडणुकीत जे जिंकले त्यांच्यासोबत जे हरले त्यांनाही धक्का बसला, असेही यावेळी राज यांनी सांगितले.
तसेच कर्नाटक, मध्यप्रदेश आणि राजस्थान या राज्यांच्या प्रश्नावर बोलताना राज म्हणाले की, भाजपाचे प्रथम लक्ष हे केंद्रात सत्ता स्थापन करणे होते, आणि म्हणूनच त्यांनी त्यावेळी तसा भास निर्माण केला होता.
गेल्या लोकसभा निवडणुकीत ३७१ मतदार संघांमध्ये ५५ लाखांहून अधिक मंतांचा गोंधळ झाला होता. मुख्यमंत्र्यांना विश्वास असेल तर त्यांनी निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्यास सहमती दर्शवावी, असे आवाहनही त्यांनी केले. ममता बॅनर्जी यांची भेटीबद्दल बोलताना ते म्हणाले की, ममतांनी याबाबत सहमती दर्शवली असुन तुम्ही तुमच्या राज्यात काम करा, आम्ही आमच्या राज्यात काम करतो, असे सांगितले.
पारदर्शक निवडणुका व्हाव्यात अशा आमची सर्वांची इच्छा आहे. यासाठी निवडणूका बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात ही आमची मागणी असल्याचे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी म्हटले. कारण जनतेलाही त्यांनी मतदान कोणाला केले हे कळले पाहिजे. तसेच ही मागणी फक्त विरोधी पक्षाची नाही नसून देशातील वेगवेगळ्या क्षेत्रातील नामवंत लोकांनी सुद्धा ही मागणी केली आहे, असेही त्यांनी सांगितले.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात असे म्हणाले की, यावेळच्या लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा धक्का जेष्ठ पत्रकार, राजनितीज्ञांना लागला. तसेच आज देशात निर्माण झालेल्या संभ्रमावस्थेची जबाबदारी निवडणूक आयोगाची व सरकारची आहे. जनतेने आमच्या या आंदोलनामध्ये सहभाग घ्यावा असे आवाहन केले.
राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ म्हणाले की, तुम्हाला जर विश्वास असेल की जनता तुम्हालाच निवडून देईल तर मग बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यास काय हरकत आहे. आज १९१ देशांपैकी फक्त १८ देशांमध्ये ईव्हीएम चा वापर केला जातो. तसेच आपण बॅलेट पेपरवर निवडणुका घेतल्यामुळे मागसलेले ठरणार नाही, असेही एका नेत्याने स्पष्ट केले.
येत्या १५ ऑगस्टला राज्यातील प्रत्येक गावात होणाऱया ग्रामसभेत गावकऱयांनी ईव्हीएम विरोधात ठराव मांडावा, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केले. यावेळी इतर विरोधी पक्षाचे नेते हजर होते.