मुंबई - एअर इंडियामध्ये अभियंता पदावरून निवृत्त झालेले दीपक अमृतलाल पांचाळ या 59 वर्षीय व्यक्तीचे अपहरण करून गुजरातमधील हलवद याठिकाणी हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने ३ आरोपींना अटक केली आहे. जयंतीभाई पटेल (वय 64), गोपाळ उर्फ करण परमार (वय 27 ), राजुभाई आगठ (वय 35), अशी आरोपींची नावे आहेत. दिपक हे 4 ऑक्टोबरला त्यांच्या अंधेरी येथील घरातून बेपत्ता झाले होते.
गुजरातमधील हलवद येथील ब्राह्मणी धरणालगत एका व्यक्तीचा मृतदेह गोधडीत सिमेंटच्या खांबाला बांधलेल्या अवस्थेत आढळून आला होता. हलवद पोलिसांनी तपास केला असता हा मृतदेह दिपक पांचाळ यांचा असल्याचे समोर आले. या प्रकरणाची माहिती अंधेरी पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी अहमदाबाद, जुनागडसह गुजरातमधील वेगवेगळ्या ठिकाणी चौकशी करून तीन आरोपींना ताब्यात घेतले.
हेही वाचा - बहिणीशी प्रेमसंबंधाच्या संशयावरून भावाने केली युवकाची हत्या; चौघांना अटक
दिपक पांचाळ यांनी आरोपींकडून स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी लाखो रुपयांचे कर्ज घेतले होते. गेल्या काही महिन्यांपासून घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी ते टाळाटाळ करत असल्याने ही हत्या झाल्याचे समोर आले आहे. आरोपींनी दिपक पांचाळ यांचे अपहरण करून त्यांना अहमदाबाद येथे एका घरात डांबून ठेवले होते. ते त्यांना मारहाणदेखील करत होते. या मारहाणीतच दिपक पांचाळ यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आरोपींनी त्यांचा मृतदेह ब्राह्मणी धरणात फेकून दिला होता. या संदर्भात पोलीस अधिक तपास करत आहेत.