मुंबई - सध्या जगभरात कोरोना सावट पसरले आहे. कोरोनाविरोधातील युद्धात एखाद्या सैनिकाप्रमाणे परिचारिका आपली भूमिका बजावत आहेत. त्यांना कोरोनाग्रस्त रुग्णांची सेवा करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे, पण त्या एखाद्या सैन्यातील सैनिकाप्रमाणे 'फ्रंट वॉरियर' बनून कोरोनाला लढा देत आहेत. अशा परिचारिकांना जागतिक परिचारिका दिनानिमित्त कलाकार चेतन राऊत यांनी पुश पिनच्या माध्यमातून आगळीवेगळी कलाकृती साकारत अभिवादन केले.
हेही वाचा - मुंबईतील कामा रुग्णालयात १०० बेड वाढवा; अमित देशमुख यांचे निर्देश
महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर सुरू आहे. परंतु, या संकटात देखील अत्यावश्यक सेवेतील सर्व कर्मचारी आपल्या जिवावर उदार होऊन काम करत आहेत. मग ते रुग्णालयात कोरोनाबाधितांना बरे करणारे डॉक्टर्स, परिचारिका असो किंवा रस्त्यावर गर्दी होऊ नये म्हणून अक्षरशः २४-२४ तास बंदोबस्ताला उभे असणारे पोलीस असो किंवा या संकट काळातही समाजाला योग्य माहिती देणारे पत्रकार असो, या साऱ्यांचेच कार्य उल्लेखनीय आहे. आणि म्हणूनच या 'रियल हिरोंच्या' कार्याला गौरवण्यासाठी कलाकार चेतन राऊत यांनी पोर्ट्रेट साकारले.
महाराष्ट्र दिनापासून म्हणजे, १ मे पासून १५ मे पर्यंतचा हा पंधरवडा म्हणजे 'मराठी भाषा संवर्धन पंधरवडा' म्हणून ओळखला जातो. त्यासोबतच १२ मे म्हणजे जागतिक परिचारिका दिन आणि या साऱ्यांचे औचित्य साधून या कोरोना योद्ध्यांचे मोझेक पोर्ट्रेट माध्यमातून चित्र साकारले आहे. यात ६ रंगछटा असलेल्या ३२ हजार ००० पुश पिनचा वापर करून हे पोर्ट्रेट साकारण्यात आले आहे. हे पोर्ट्रेट ४ बाय ६ फूट लांबीचे असून याला तयार करण्यासाठी चेतन राऊतसोबत सिद्धेश रबसे, मयूर अंधेर व ४ वर्षांचा बाल कलाकार आयुष कांबळे याने साथ दिली. अवघ्या 48 तासांत हे चित्र त्यांनी पूर्ण केले आहे. सध्या लॉकडाऊनमुळे हे पोर्ट्रेट पवईमधील चेतनच्या राहत्या घरीच तयार करण्यात आले आहे.
या पोर्ट्रेटमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, परिचारिका म्हणून ब्लेसी मॅथ्यू, पोलीस, पत्रकार यांच्या चित्रांचा समावेश आहे. आणि या कलाकृतीची विक्री झाल्यास त्याच्या एकूण मिळकतीपैकी 50 टक्के मिळकत ही लॉकडाऊन काळातील गरजूंना अन्नदान करण्यासाठी वापरणार असल्याचे चेतन राऊत यांनी ठरवले आहे.
हेही वाचा - महाराष्ट्रात कोव्हॅक्सिनच्या निर्मितीला ताबडतोब परवानगी द्या; मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश