मुंबई - मुंबईत कोरोना विषाणूचे रोज शेकडो रुग्ण आढळून येत आहेत. मुंबईत आज पुन्हा कोरोनाचे 769 नवे रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे कोरोनाग्रस्तांचा आकडा 10 हजार 527 वर पोहचला आहे. तर मुंबईत 25 जणांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 412 वर पोहचला आहे. मुंबईमधून आतापर्यंत 2 हजार 287 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
मुंबईत आज कोरोना विषाणूचे नव्याने 769 रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी 554 रुग्ण गेल्या 24 तासात आढळून आले आहेत. तर 215 रुग्ण 2 त 4 मे दरम्यान खासगी लॅबमध्ये करण्यात आलेल्या कोरोना टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आले आहेत. मुंबईत 25 जणांचा मृत्यू झाला असून त्यापैकी 19 जणांना दिर्घकालीन आजार होते.
25 मृतांपैकी 15 पुरुष तर 10 महिला रुग्ण आहेत. मृतांपैकी एकाचे वय 40 पेक्षा कमी होते, 12 जणांचे वय 60 वर्षांपेक्षा जास्त होते तर 12 जणांचे वय 40 ते 60 दरम्यान होते. मुंबईमधून 159 रुग्णांना गेल्या 24 तासात डिस्चार्ज देण्यात आला. मुंबईमध्ये आतापर्यंत 2287 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
धारावीत कोरोनाचे 733 रुग्ण, 21 मृत्यू -
कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या धारावीमध्ये आज 68 नवे रुग्ण आढळून आले आहेत तर एकाचा मृत्यू झाला आहे. यामुळे धारावीमधील एकूण रुग्णांचा आकडा 733 वर पोहचला असून मृतांचा आकडा 21 वर पोहचला आहे.