नवी मुंबई - कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सोमवारी नवी मुंबईत 34 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. रुग्णांची संख्या वाढत असल्याने महानगरपालिका प्रशासनाची डोकेदुखीदेखील वाढत आहे. त्यात नवी मुंबईतील एपीएमसी मार्केट हे कोरोनाचे हॉटस्पॉट बनले आहे.
नवी मुंबईत अत्यावश्यक सेवेत कार्यरत असणाऱ्या व एपीएमसी बाजारात कार्यरत व्यक्तींच्या माध्यमातून नातेवाईकांना कोरोनाची बाधा होत आहे. शहरात आत्तापर्यंत 359 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले असून पैकी 11 हे इतर ठिकाणचे रहिवासी होते. तर, आत्तापर्यंत नवी मुंबईत 4 हजार 323 लोकांची कोरोनाची चाचणी करण्यात आली आहे. यामध्ये 2 हजार 950 जण निगेटीव्ह आले असून 1 हजार 25 अहवाल प्रलंबित आहेत. सद्यस्थितीत शहरातील पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या 348 इतकी आहे.
सोमवारी 118 जणांचे कोरोनाचे अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी 84 जणांचे अहवाल निगेटीव्ह आले असून, 34 जण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये बेलापूरमधील 2, तुर्भेमध्ये २, कोपरखैरणेमध्ये 10, नेरुळमध्ये 3, वाशी 2, घणसोली 6, ऐरोलीमध्ये 1 व दिघ्यात 1 अशा 34 जणांचा समावेश आहे.
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये (एपीएमसी) 5 नवे कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. आतापर्यंत एपीएमसी बाजारात कार्यरत 34 व्यक्ती कोरोनाबाधित आढळल्या आहेत. तसेच एपीएमसी बाजारात कार्यरत व्यक्तींच्या 6 निकटवर्तीयांचे कोरोनाचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून आतापर्यंत 60 निकटवर्तीयांना कोरोनाची बाधा झाली आहे. एपीएमसी बाजार परिसर हा कोरोनाचा हॉटस्पॉट बनला असून, व्यापारी, माथाडी, मापाडी, सुरक्षारक्षक व इतर कार्यालयीन कामकाज करणारे कर्मचारी यांच्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.