मुंबई - 'देशातील कोरोना अद्यापही पूर्णपणे संपुष्टात आला नाही. या विषाणू विरोधातील लढाई सुरू आहे. कोरोना नियमांचे पालन करत आज ध्वजारोहण करण्यात आले. स्वातंत्र्य दिनाच्या अमृतमहोत्सवी वर्धापनदिनाच्या निमित्ताने वृक्षारोपणसारखे चांगले सामाजिक उपक्रम आज पार पडले. याचा उपयोग नक्कीच भविष्यात होईल. तसेच पुढील वर्षी स्वातंत्र्य दिनी देश कोरोनामुक्त असेल', असा विश्वास आज विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी व्यक्त केला. ७५ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त दहिसर पोलीस स्टेशन व दहिसर चेकनाका येथे ध्वजारोहणाचा कार्यक्रम प्रविण दरेकर यांच्या प्रमुख उपस्थित पार पडला. यावेळी ते बोलत होते.
'स्वातंत्र्य दिन सुवर्ण अक्षरांनी लिहिलेला दिवस'
'गेले दोन वर्ष कोरोनामुळे साध्या पद्धतीने स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत. पण पुढच्या वर्षी नक्कीच कोरोनामुक्त स्वातंत्र्य दिन आपण साजरा करू. १५ ऑगस्ट १९४७ हा दिवस सुवर्ण अक्षरांनी लिहिलेला दिवस आहे. लाखो लोकांच्या रक्ताने, समर्पणाने, बलिदानाने लाल झालेल्या मातीने आज स्वातंत्र्याचा दिवस पाहिला आहे. तसेच कोरोना संकट काळातही अनेक लढवय्ये कोरोनाच्या मुक्तिसाठी कोविड योद्धे म्हणून लढले. त्यांना आपण आज नम्रपणे अभिवादन करत आहे', असे दरेकरांनी म्हटले.
इतक्या कार्यक्रमांना दरेकरांची उपस्थिती
विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आज दहिसर येथील वॉर्ड क्र. ३ येथील भाजपा कार्यालय, वॉर्ड क्र. ४ येथील रावळपाडा व वॉर्ड क्र. ५ येथील केसरीनंदन बिल्डिंग तसेच वॉर्ड क्र. ५ येथील भाजपा जनसंपर्क कार्यालयात ध्वजारोहण पार पडले. बोरिवली मधील काजुपाडा येथील वॉर्ड क्र. ११ व कांदिवली येथील वॉर्ड क्र. २५ येथे दरेकर यांच्या उपस्थितीत ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला. नगरसेविका प्रीतमताई पडांगळे यांच्या वर्ड क्र. २६ येथे दरेकर यांच्या उपस्थित ध्वजारोहण झाले. तसेच स्वातंत्र्य दिनानिमित्त देवीपडा हायवे येथील मैदान सुभोशीकरण व वृक्षारोपण कार्यक्रम दरेकर यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी खासदार गोपाळ शेट्टी, प्रकाश दरेकर यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
हेही वाचा - सर्वसामान्य जनतेच्या अडचणी सोडवण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध- डॉ. राजेद्र शिगणे