मुंबई - फनी चक्रीवादळाचा महाराष्ट्रवर कोणताही परिमाण होणार नाही, अशी माहिती प्रादेशिक हवामान विभाग, मुंबईचे केंद्रप्रमुख के. एस. होसालीकर यांनी दिली. फनी चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर 'ई टीव्ही भारत'शी ते बोलत होते.
राज्यात सकाळी काही भागात ढगाळ वातावरण होते. परिणामी, राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात किंचित अंशी घट नोंदवण्यात येत आहे. तापमान वाढले की अशा प्रकारचे बदल होत असतात. परंतु फनी चक्रीवादळाचा महाराष्ट्रवर कोणताही परिमाण होणार नाही, असे होसालीकर म्हणाले.
महाराष्ट्रात पावसाचे सध्या तरी चिन्ह दिसत नाही. राज्यात उष्णतेत वाढ झाली होती. मराठवाडा, विदर्भात ४५ ते ४७ सेल्सिअस नोंद एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात होती. सध्या तापमानात वाढ कायम राहणार आहे. राज्यातील पावसासंदर्भात येत्या काही दिवसात परिस्थिती स्पष्ट होईल असेही त्यांनी सांगितले.
वादळी वारे, समुद्राच्या लाटा, घोंगवणारे वारे हर शारे पूर्व किनारपट्टी भागासाठी आहेत. उत्तर आंध्रप्रदेश, ओडीसा, पश्चिम बंगाल या तटवर्ती भागाला फनी वादळाचा थेट फटका बसणार आहे.
४ आणि ५ मे दरम्यान ईशान्यकडील राज्यांना इशारा देण्यात आला आहे. पश्चिम भागाच्या किनारपट्टीवर तसा काही थेट फरक होण्याची शक्यता नाही. महाराष्ट्राला या फनी वादळाचा कोणताही परिणाम होणार नाही. ढगाळ वातावरणामुळे काही भागात तुरळक सरी कोसळू शकतात. फनीवादळावर हवामान विभागाचे लक्ष असल्याचे होसालीकर यांनी सांगितले.
दरम्यान, तापमानात बदल झाल्याने ४ मे रोजी मुंबई आणि आसपासच्या परिसरात हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज होसालीकर यांनी वर्तवला आहे.