मुंबई - कोकणात गणेशोत्सवसाठी विशेष गाड्या सोडण्यावरून रेल्वे प्रशासन आणि राज्य सरकार यांच्यात वाद सुरू आहे. आम्ही परवानगी मागितली होती, मात्र रेल्वे बोर्डाकडून देण्यात आली नाही, असे राज्य शासनाचे म्हणणे आहे. तर कोकणात जाणाऱ्या गाड्यांना राज्य सरकारने स्थगिती दिली, असे सांगत मध्य रेल्वे व रेल्वे बोर्डाने राज्य शासनाकडे बोट दाखवले आहे.
राज्याचे आपत्ती व्यवस्थापन संचालक अभय यावलकर यांनी कोकणात गणोशोत्सवसाठी विशेष गाड्या सोडण्याची मागणी पत्राद्वारे मध्य रेल्वेला केली होती. त्यानुसार मध्य रेल्वेने 11 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर या कालावधीसाठी 200 विशेष गाड्यांचे वेळापत्रक तयार करून गाड्या ही सज्ज ठेवल्या होत्या. विशेष गाड्यांसाठी संबंधित क्वारंटाइनचा कालावधी पाहता सलग सप्टेंबरपर्यंत ट्रेन चालवणे शक्य नसल्याने 12 ऑगस्टपर्यंत गाड्या चालवून उपयोग काय असे रेल्वे बोर्डाकडून सांगण्यात आल्याचे समजते.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आधीच 23 जुलै रोजी मध्य रेल्वेने राज्य शासनाला पत्र लिहून कोकणातील गणपती विशेष लांब पल्ल्याच्या मेल एक्सप्रेस गाड्या चालवण्यासाठी विचारणा केली होती. त्यानंतर राज्य शासनाच्या आपत्ती संचालन विभागाच्या संचालकाकडून 8 ऑगस्ट रोजी कोकण विभागाकडून गाड्या तयार ठेवण्याचे सांगण्यात आले. त्यानुसार मध्य रेल्वेने गाड्या वेळापत्रक तयार करून परवानगीसाठी रेल्वे बोर्डाला पाठवले. गृहमंत्रालयाने आंतर जिल्ह्यासाठी दिलेल्या कोविडच्या सूचनाचे पालन करून 9 ऑगस्ट रोजी परवानगी दिल्याचे मध्य रेल्वेचे म्हणणे आहे.
सर्व नियमांचे पालन करून गाड्या चालवण्यासाठी मध्य रेल्वेने तयारी केली. त्यानंतर 8 ऑगस्टला महाराष्ट्र शासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी फोनवरून गाड्याना स्थगिती देण्यास सांगितले. अजूनही मध्य रेल्वे व रेल्वे बोर्ड कोकण विशेष गाड्या चालवण्यासाठी राज्य शासनाच्या संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत, असे मध्य रेल्वेचे प्रमुख जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी सांगितले.