मुंबई - महाराष्ट्राच्या राजकारणाला लोकनेते दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी नवी दिशा दिली. कठोर मेहनतीच्या जोरावर तळागाळातील लोकांपर्यंत भाजप पक्ष पोहोचविला. मात्र, मुंडे यांच्या पश्चात त्यांच्या वारसांना भाजपकडून अन्यायाचा सामना करावा लागतो, असे चर्चा होती. मात्र, केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारातून डॉ. प्रीतम मुंडे यांना डावलल्यानंतर यावर शिक्कामोर्तब झाल्याचे बोलले जात आहे.
फडणवीस यांनी उट्टे काढल्याची चर्चा -
विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात माजी मंत्री आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्यावर चिक्की घोटाळ्याचे आरोप झाले. तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी तो परतवून लावला. मात्र, प्रत्यक्षात हे प्रकरण मुख्यमंत्री कार्यालयातूनच बाहेर पडल्याचे समजताच फडणवीस आणि मुंडे यांच्या वितुष्ट निर्माण झाले. त्यामुळे पंकजा यांना शह देण्याकरिता सुरेश धस यांच्याकडे या ऊसतोडणी कामगारांचे नेतृत्त्व देण्यात आले. पंकजा मुंडे त्यानंतर कमालीच्या अस्वस्थ झाल्या. पक्षाविरोधात शिवाजी पार्कवर शक्तीप्रदर्शन करण्याचा त्यांनी इशारा दिला. तसेच ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यांवरून फडणवीसाना लक्ष्य केले होते. मात्र, केंद्रीय मंत्रिमंडळाच्या मंत्र्यांच्या यादीतून फडणवीस यांनी उट्टे काढल्याची जोरदार चर्चा आता राजकिय वर्तुळात सुरू झाली आहे.
फडणवीस यांना टार्गेट केल्याची परिणीती -
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात मंत्रिमंडळात समावेश होणाऱ्या महाराष्ट्रातील मंत्र्यांची यादी पाहिली तर त्यावर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पगडा दिसतो. नारायण राणे यांच्यानंतर खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांचे नाव सर्वात आघाडीवर होते. मात्र, ऐनवेळी प्रीतम मुंडे यांच्याऐवजी डॉ. भागवत कराड यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला. पंकजा मुंडे यांनी एकनाथ खडसे यांच्यासोबत ज्यापद्धतीने फडणवीस यांना टार्गेट केले होते. त्याची परिणीती प्रीतम मुंडे यांचे मंत्रीपद न मिळण्यापर्यंत झाली असावी, असे मत राजकिय विश्लेषक श्रीरंग सुर्वे मांडतात.
हा तर मुळ ओबीसीवर अन्याय -
केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात गोपीनाथ मुंडे यांची कन्या प्रीतम मुंडे तिला मंत्रिमंडळात स्थान दिलेले नाही. भाजपच्या ओरिजनल ओबीसी चेहऱ्यावर हा अन्याय म्हणता येईल, अशी परखड टीका प्रकाश शेंडगे यांनी केली. भागवत कराड ओबीसी आणि वंजारी समाजाचे आहेत. मात्र, गोपीनाथ मुंडे यांनी भाजपला खरा ओबीसी चेहरा दिला होता आणि तो या मंत्रिमंडळात नाही आहे, याकडे प्रकाश शेंडगे यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
गोपीनाथ मुंडे देखील होते नाराज -
भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचा विरोध डावलून तत्कालीन प्रदेशाध्यक्ष नितीन गडकरी यांनी मधू चव्हाण यांची मुंबई भाजपच्या अध्यक्षपदी नियुक्ती केल्यामुळे महाराष्ट्रातील भाजपमध्ये आगडोंब उसळला होता. त्यावेळी मुंडे यांच्या राजीनाम्याच्या इशाऱ्याने दिल्लीपर्यंत या वादाचे हादरे बसले होते. मुंडे यांच्या पक्षात रुसण्याच्या अशा घटना किमान दोन-तीनवेळा घडल्या होत्या. पंकजा मुंडे यांनीही सध्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात परखड भूमिका घेतली होती. यामुळे गोपीनाथ मुंडे यांच्या वारसांवर अन्याय करण्यात येत असल्याचे बोलले जात आहे.
गोपीनाथ मुंडे यांच्यामुळे भाजपची जनमानसात ओळख -
मराठवाड्यातील बीड जिल्ह्यामधील परळी तालुक्याच्या नाथ्रा गाव हे दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांचे मूळगाव होते. त्यांचे घराणे राजकीय नसल्याने त्यांना घरून कुठलाही राजकारणाचा वारसा नव्हता. संघर्ष करीत ते लोकसभेचे सदस्य झाले. तथाकथित उच्चवर्गीयांपुरत्या मर्यादित असलेल्या भाजपला तळागाळातील लोकांपर्यंत नेण्याचे काम मुंडे यांनी केले. दांडगा जनसंपर्क, अन्यायाविरुद्ध संघर्षाची जिद्द, नवा विचार, उत्साह असलेल्या मुंडेंनी भाजपला जनमानसात स्थान मिळवून दिले.
हेही वाचा - केंद्रीय मंत्रिमंडळ खाते वाटप; जाणून घ्या, नवीन मंत्र्यांकडे कोणते सोपविले मंत्रालय