मुंबई - अभिनेता सलमान खानला डेंग्यूची लागण झाली असून त्याच्यावर उपचार सुरू असल्याचे समोर आले होते. मात्र, याबाबत पालिकेकडे कोणतीही नोंद झालेली नाही. याची माहिती पालिकेला दिल्यास डेंग्यूच्या आळ्या कुठे निर्माण झाल्या याचा शोध घेवून त्या नष्ट केल्या जातील, अशी माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली होती. त्यानंतर पालिकेच्या कीटक नाशक विभागाने सलमानच्या घरी तसेच तो राहत असलेल्या इमारतीच्या परिसरात रविवारी डासांचा आणि आळ्यांचा शोध घेतला असता, काहीही आढळून आले नाही.
सलमानच्या घरी डेंग्यूच्या आळ्या नाही - सलमान खानला डेंग्यू झाल्याचे समोर आले आहे. त्यानंतर सलमान राहत असलेल्या मुंबईतील बांद्रा गॅलेक्सी इमारतीच्या परिसरात पालिकेकडून डासांचा आणि आळ्यांचा शोध घेण्यात आला. डेंग्यू पसरवणाऱ्या एडिस इजिप्ती या डासांच्या आळ्यांची पैदास प्रामुख्याने स्वच्छ पाण्यात होते. त्यामुळे सलमान खान राहत असलेल्या संपूर्ण इमारतीत पालिकेच्या किटकनाशक विभागाच्या वतीने डासांची पैदास नष्ट करण्यात आली. तसेच, धूर फवारणी करण्यात आली. सलमान खान हा सध्या पनवेलच्या फार्म हाऊसवर राहत असून त्याचे कर्जत इथं शुटींग सुरू आहे. त्यामुळे तो मुंबईतल्या घरी बरेच दिवस आला नसला तरी खबरदारीचा उपाय म्हणून गॅलेक्सी इमारतीत डासांची पैदास शोधण्यात आली. परंतु, इथे डेंग्यूला कारणीभूत ठरलेल्या एडिस इजिप्ती डासांच्या आळ्या मिळालेल्या नाहीत अशी माहिती पालिकेच्या कीटक नाशक विभागाकडून देण्यात आली आहे.
परिसरात ६ ठिकाणी आळ्या, धूर फवारणी - दरम्यान कीटक नाशक विभागाने सलमान राहत असलेल्या विभागातील ३०८ घरााना भेटी दिल्या. त्यात ३२३ कंटेनर तपासण्यात आले. त्यामध्ये ६ घरात डेंग्यूच्या आळ्या आढळून आल्या. डेंग्यूच्या आळ्या बानू शकतात अशा २७ वस्तू नष्ट करण्यात आल्या आहेत. सलमान राहत असलेल्या ५ विभागात तसेच २८७ झोपड्यांमध्ये धूर फवारणी करण्यात आल्याचे पालिकेच्या कीटक नाशक विभागाने सांगितले.