मुंबई - अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मुंबई आणि गुजरातच्या किनारपट्टीला वादळाचा तडाखा बसण्याची शक्यता आहे. ३ जूनच्या सुमारास महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर 'निसर्ग' चक्रीवादळ पोहोचणार असून मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या चक्रीवादळाची स्थिती उपग्रहाद्वारे तपासली जात आहे. तसेच नौदल आणि तटरक्षक दलांच्या डॉर्नियर विमानानेही अरबी समुद्राची पाहणी केली जात आहे.
अरबी समुद्रातील परिस्थितीवर तटरक्षक दलाचे डॉर्नियर विमान तसेच चेतक हेलिकॉप्टरमधून सतत निरीक्षण केले जात आहे. तसेच खोल समुद्रात कोणी मासेमारी करणारी बोट आढळल्यास तात्काळ समुद्रात गस्त घालणाऱ्या तटरक्षक दलांच्या बोटींना कळवलेही जात आहे.
नौदलाचेही सी-किंग हेलिकॉप्टर सध्या अरबी समुद्रात आपत्कालिन परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहेत. याबरोबरच नौदलातर्फे अरबी समुद्रात मदतीसाठी 5 जेमिनी बोटी तैनात करण्यात आल्या असून राज्य शासनाच्या सूचनेनुसार हवी ती मदत नौदलातर्फे करण्यात येणार आहे. तटरक्षक दलातर्फे खोल समुद्रात गेलेल्या मच्छिमारी करणाऱ्या बोटींना सूचना देऊन तात्काळ सुमद्रकिनारी पोहोचण्याच्या सूचना दिल्या जात आहेत.
दरम्यान, निसर्ग चक्रीवादळास तोंड देण्यासाठी राज्याचा आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभाग पूर्णपणे तयारीत आहे. मच्छिमारांनाही समुद्रातून बोलावून घेण्यात येत असून जीवित हानी होणार नाही, याची काळजी प्रशासनाकडून घेण्यात येत आहे.
हेही वाचा - चक्रीवादळाचा धोका लक्षात घेऊन प्रशासन सजग - महसूलमंत्री
हेही वाचा - कोरोनाच्या संकटात आता 'निसर्ग'चे महासंकट; आपत्ती व्यवस्थापन, मदत पुनर्वसन विभाग सज्ज