मुंबई : शरीर हे क्षणभंगुर आहे. एकदा का शरीरातून जीव निघून गेला की शरीर शून्य होते. पण मृत्यूनंतर तुम्हाला जिवंत राहायचे असेल तर या शरीरातील अवयव मात्र उपयोगी ठरतात. अवयवच्या रुपाने मृत्यू झालेल्याला आणि ज्याच्या कामी अवयव आले त्यालाही दुसरे जीवन मिळते. त्यामुळे ‘अवयव दान करा’ असे म्हणत गेल्या 15 वर्षांपासून एक व्यक्ती अवयव दानाचे मोलाचे काम करत आहे. या व्यक्तीने अवयव दानाची चवळवळ सुरू करत आतापर्यंत तब्बल 759 जणांना 'जीवनदान' दिले आहे. यात अगदी मुंबईतील चिमुरड्या आराध्या मुळ्ये चाही समावेश आहे. आज 13 ऑगस्ट, जागतिक अवयव दान दिन म्हणून साजरा होत आहे. त्या निमित्ताने या देवदूताच्या प्रवासाबरोबरच अवयव दानाच्या चळवळीबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न 'ईटीव्ही भारत'ने केला आहे.
गुजरात, सुरतमध्ये राहणाऱ्या निलेश मंडलावाला यांच्या वडीलांना 1997 पासून किडनीच्या आजाराचा त्रास होता. त्यानंतर ते डायलिसिसवर होते. मात्र, काही आरोग्याच्या त्रासामुळे त्यांच्या घरचे किडनी दान करू शकत नव्हते. अशात त्यांना गरीब लोकांना डायलसीसचा खर्च परवडत नाही, तर अवयव प्रत्यारोपणही त्यांच्यासाठी सोपे नसते हे जाणवले. त्यातूनच त्यांनी 2005 मध्ये अवयव दानासाठी काम करण्याचा निर्णय घेतला. एकट्यानेच हा प्रवास सुरू झाला. तर कॅडव्हर अवयव दान म्हणजे मृत्यू पश्चात त्यातही ब्रेन डेड करण्यात येणाऱ्या अवयव दानासाठीचा हा प्रवास होता. रुग्णालय-डॉक्टरांना भेटत ब्रेन डेड व्यक्तीच्या नातेवाईकांना शोधणे आणि त्यांना कमीत कमी वेळात अवयव दानासाठी तयार करणे हे मोठे आव्हान ते हळूहळू यशस्वीपणे पेलु लागले.

सन 2005 पासून त्यांनी किडनी अवयव दानाविषयी जनजागृती करत दाते मिळवण्यास सुरवात केली. पुढे हृदय, फुफ्फुस, लिव्हर, स्वादुपिंड दानासाठीही ते काम करू लागले. ब्रेन डेड व्यक्तीच्या नातेवाईकांपर्यंत शक्य तितक्या लवकर पोहचत त्यांना अवयव दानासाठी तयार करण्याचे अवघड काम त्यांच्यासाठी सोपे होऊ लागले. ब्रेन डेड झाल्यानंतर 4 तासांत हृदय दान करावे लागते आणि त्याच वेगात ते गरजूपर्यंत पोहचवावे लागते. हे ही काम ते यशस्वीरित्या करू लागले. 2014 पर्यंत त्यांनी 108 किडनी दाते मिळवत कित्येकांना नवजीवन दिले. पुढे त्यांनी या चळवळीची व्याप्ती वाढवत 'डोनेट लाईफ' संस्था सुरू केली.
या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी गुजरातच नव्हे तर मुंबई, दिल्ली, चेन्नईतील लोकांचेही प्राण वाचवले आहेत. त्यातही सर्वाधिक अवयव हे मुंबईकरांनाच नवजीवन देणारी ठरली आहेत. कारण निलेश यांच्या संस्थेकडून आतापर्यंत 27 ह्रदय दान करण्यात आली आहेत. त्यातही 20 हृदये ही मुंबईतील रुग्णांना देण्यात आली आहेत. यात आराध्या मुळ्ये हिचाही समावेश आहे. दरम्यान 15 वर्षात त्यांच्या संस्थेच्या माध्यमातून 363 किडनी, 149 लिव्हर, 27 ह्रदय, 7 स्वादुपिंड आणि 4 फुफ्फुस दान करण्यात आले आहे. महत्वाचे म्हणजे दान केलेले अवयव गरजुंना-गरिबांना विनामूल्य मिळत असल्याने ही संस्था गरजुंसाठी मोठा दिलासा ठरत आहे. त्याचवेळी ब्रेन डेड व्यक्तीकडून अवयव दान झाल्यानंतर त्याच्या अंत्यसंस्कारापासून त्याच्या कुटुंबाला लागेल ती मदतही ही संस्था करते. तर, गरीब कुटुंबातील मुलाचा शैक्षणिक खर्चही संस्था उचलते. त्यामुळे निलेश आणि त्यांच्या संस्थेचे जितके कौतुक करावे तितके कमी आहे.
देशात वर्षाला सुमारे 5 लाख लोकांचा मृत्यू केवळ अवयव न मिळाल्याने होतो. तर, आजही लाखो लोकांना अवयवाची गरज आहे. आपल्या देशात वर्षाला सुमारे 1 लाख लोकं ब्रेन डेडने मरतात. पण अवयव दानाबाबत जनजागृतीच नसल्याने भारतात केवळ एक टक्केच अवयव दान होते आणि ही निराशाजनक बाब असल्याचे निलेश यांनी सांगितले आहे. तर, आज जगभर जागतिक अवयव दिन साजरा होत असताना अवयव दान हे जीवनदान आहे. मृत्यूनंतरही तुम्ही आणि तुमच्याबरोबर एकाच वेळी पाच-सहा जणांना जिवंत ठेवू शकता. त्यामुळे अवयव दानासाठी ब्रेन डेड व्यक्तीच्या नातेवाईकांनी पुढे यावे हेच सांगणे असल्याचेही त्यांनी शेवटी सांगितले.