मुंबई - ज्यांना राफेल प्रकरणाची फाईल सांभाळता येत नाही ते देशाचे संरक्षण काय करणार, असा सवाल करत पत्रकार निखिल वागळे यांनी सरकारवर जोरदार टीका केली. राफेल विमान कराराशी निगडीत कागदपत्रे संरक्षण मंत्रालयातून चोरीला गेल्याचा दावा महाधिवक्ता के के वेणुगोपाल यांनी सुप्रीम कोर्टात केला. त्यानंतर भाजप सरकारवर चारी बाजूनी टीका केली जात आहे.
दादरमधील शिवाजी नाट्य मंदिर येथे आयोजित केलेल्या श्रमिक जनतेचा जाहीरनामा या कार्यक्रमात वागळे बोलत होते. जगण्याच्या हक्काचे आंदोलन मार्फत 'श्रमिक जनतेचा जाहीरनामा' तयार करण्यात आला आहे. हा जाहीरनामा सर्वांसमोर मांडण्यासाठी 'श्रमिक जनतेची जाहीरनामा परिषद' घेण्यात आली.
जाहीरनाम्याचे महत्त्व वाढवले पाहिजे. जाहीरनामा फक्त निवडणुकीपूरता नसावा. त्याची अंबलबजावणीही केली पाहिजे. सर्व पक्षांनी जाहीरनाम्यांना महत्व दिले पाहिजे. आता युद्धाचे भांडवल केले जात आहे. या सरकारने विकास केला नाही, हे लपण्यासाठी पुलवामा अतिरेकी हल्ल्याचे भांडवल केले जात आहे. भारतीय सैनिकांनी उत्तर दिलं पाहिजे. हा तयार करण्यात आलेला जाहीरनामा एक चांगला उपक्रम आहे. पण हा जाहीरनामा सर्वसामान्यापर्यंत पोहचला पाहिजे असे वागळे म्हणाले.