मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीचे निकाल जाहीर होऊ लागले आहेत. देशात आणि राज्यात भाजपला मोठे यश मिळाल्याचे या निकालातून स्पष्ट होत आहे. महाराष्ट्रात भाजपला २३ जागांवर आघाडी मिळाली तर शिवसेनेला १९ जागांवर आघाडी मिळाली आहे. त्यातील बऱ्याच जागांचे निकालही आले असून संबंधीत मतदार संघात युतीचे उमेदवार विजयी झाले आहेत. निकालाचे कल हाती आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भाजप कार्यालयात दाखल झाले. त्यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले.
या निकालाबाबत बोलताना मुख्यमंत्र्यांनी विजयाचे यश हे महायुतीचे असल्याचे मत व्यक्त केले आहे. यावेळी बोलताना त्यांनी जनतेने दिलेला कौल हा मोदींकडे पाहून दिला असून जनता काँग्रेसच्या भूलथापांना बळी पडली नसल्याचेही ते म्हणाले होते. यापुढे विधानसभा निवडणुकीतही शिवसेनेसोबत युती राहणार असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले होते.
दरम्यान, भाजप सेनेला राज्यात मिळालेल्या यशानंतर भाजप कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात जल्लोष केला. तसेच मुख्यमंत्र्याचे कार्यालयात आगमण होताच ढोल ताशांचा गजरात आणि मोठ्या जल्लोषात त्यांचे स्वागत करण्यात आल्याचे चित्र यावेळी पाहायला मिळाले.