मुंबई: सुनावणी दरम्यान एनआयए (NIA) च्या वतीने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल वकील अनिल सिंग यांनी युक्तिवाद करताना असा दावा केला की, विक्रोळीत झालेल्या कथित बैठकीमध्ये मनसुख हिरेन, सचिन वाझे यांच्यासह चार ते पाच अधिकारी या बैठकीला उपस्थित होते, असे मनसूख हिरेन याच्या दुकानात काम करणाऱ्या कर्मचाऱ्याने दिलेल्या जबाबात म्हटले असल्याचे अनिल सिंह यांनी युक्तीवादा दरम्यान म्हटले आहे. विक्रोळीच्या भागात मनसूख हिरेन यांचे लोकेशन ट्रेस झाले झाले आहे. असा दावा देखील अनिल सिंग यांनी केला आहे. न्यायमूर्ती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती आर एन लड्डा यांच्या खंडपीठांसमोर केला आहे. पुन्हा या अर्जावर सुनावणी होणार आहे.
सीसीटीव्ही फुटेज खंडपीठांसमोर दाखल करण्याचे निर्देश: एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्या वकिलांनी आरोप पत्रांमधील अनेक मुद्द्यांवर घेतलेल्या हरकती नंतर न्यायाधीश मोहिते डेरे आणि न्यायाधीश आर एन लड्डा यांच्या खंडपीठाने यांना आज होणाऱ्या सुनावणी दरम्यान सीसीटीव्ही फुटेज खंडपीठांसमोर दाखल करण्याचे निर्देश दिले आहे. गुरुवारी सुनावणी दरम्यान एनआयए (NIA) च्या वतीने अनिल सिंग यांनी युक्तिवाद केला.
अनेक अधिकारी कर्मचाऱ्यांचा समावेश: आरोपपत्र ९ ते १० हजार पानांचे असून यात मुंबई पोलीस दलातील अनेक अधिकारी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. बडतर्फ सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे, माजी एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा, निलंबित एपीआय रियाझुद्दीन काझी, निलंबित पोलीस निरीक्षक सुनील माने, निलंबित पोलीस हवालदार विनायक शिंदे, नरेश गोर, संतोष शेलार, आनंद जाधव, मनीष सोनी व सतीश तिरूपती मुतकारी यांच्या नावांचा समावेश आहे.
एनआयए (NIA) चा दावा काय?: मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा तपास करताना सचिन वाझे यांच्यासोबत सतीश, मनिष आणि प्रदीप शर्मा यांचा सहभाग स्पष्ट झाला. सतीश आणि मनिष यांनी मनसुख हिरेनची हत्या केल्याची कबुली दिली. सचिन वाझे आणि प्रदीप शर्मा यांच्या आदेशानेच त्यांनी मनसुख हिरेनची हत्या केली. हत्येनंतर दोघांनी प्रदीप शर्मा आणि सचिन वाझे यांच्याशी संपर्क साधला होता. या हत्येसाठी दोघा आरोपींना रोख रक्कम देण्यात आली होती असा दावा एनआयएच्या वकिलांनी कोर्टात केला.
कोणत्या कलमाखाली गुन्हे?: या आरोपपत्रामध्ये आरोपींविरुद्ध भादंवि १२०(ब), २०१, २८६, ३०२, ३६४, ३८४, ३८६, ४०३, ४१९, ४६५ तसेच भादंवि ४७१, ४७३ आणि ५०६ कलमान्वये गुन्हे दाखल केलेले आहेत. याचबरोबर शस्त्रास्त्र कायद्याच्या कलम ३ आणि २५ नुसार व स्फोटक पदार्थ कायद्याच्या कलम ४, १६, १८ व २० UP(p) अंतर्गत गुन्हे दाखल केलेले आहेत.
मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण नेमके काय?: मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ आढळली होती. ती स्कॉर्पिओ मनसुख हिरेन यांची होती. जी स्कॉर्पिओ अंबानींच्या घराबाहेर सापडली होती त्या गाडीमालकाचा मृतदेह सापडला आहे. मनसुख हिरेन यांचा मृतदेह 5 मार्चला मुंब्रा रेतीबंदर भागात सापडला होता. ही हत्या असल्याचा दावा करत एनआयएने सचिन वाझे यांना अटक केली. सध्या ते कोठडीत आहेत. या प्रकरणात आठ आरोपी विरोधात आरोपपत्र दाखल केले आहे. हे आठही आरोपी न्यायालयीन कोठडीत आहे.
पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत: मनसुख हिरेन यांची हत्या घडली त्या रात्री नेमके काय घडले याचे पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत. त्या रात्री आरोपींनी हिरेन यांच्या नाकावर जबरदस्ती क्लोरोफॉर्म टाकले. त्यामुळे हिरेन तात्काळ बेशुद्ध पडले. त्यानंतर आरोपींनी त्यांची हत्या केल्याचे उघडकीस आले. पोस्टमार्टमच्या रिपोर्टनुसार, हत्येपूर्वी हिरेन यांच्या चेहऱ्यावर डाव्या बाजूला मार लागलेला होता. तसेच त्यांच्या अंगावर काही ठिकाणी मार होता. विशेषत: डोक्यालाही मार लागलेला होता.