मुंबई - मुकेश अंबानींच्या घराबाहेर 25 फेब्रुवारीच्या रात्री पीपीई किटमध्ये दिसलेली व्यक्ती सचिन वाझेच असल्याचे एनआयएने स्पष्ट केले आहे. जी स्कॉर्पिओ गाडी अँटिलिया इमारतीच्या बाहेर काही अंतरावर पार्क करण्यात आली होती, त्या मागे असलेल्या इनोव्हा कारचा चालक दुसरा कोणी नसून स्वतः सचिन वाझे असल्याचा दावा एनआयएच्या सूत्रांनी केलेला आहे.
वाझेंनी मोबाईलही दिला फेकून
कुणीही ओळखू नये म्हणून सचिन वाझेंनी मोठ्या रुमालाने तोंड बांधल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. सचिन वाझेंनी पीपीई किट नव्हे तर ओव्हरसाईजचा पायजामा आणि कुर्ता घातलेला होता. आपली देहबोली झाकण्यासाठी त्यांनी असे केल्याचे एनआयएने म्हटले आहे. सचिन वाझेंच्या केबिनमधून एक लॅपटॉपही जप्त करण्यात आला आहे. मात्र त्यातील डेटा आधीच डीलीट केला होता. सचिन वाझेंना मोबाईल देण्यास सांगितले असला त्यांनी तो कुठेतरी पडल्याचे सांगितले. मात्र त्यांनी तो हेतूपूर्वक कुठेतरी फेकल्याचे एनआयएने म्हटले आहे.
इनोव्हा चालक सचिन वाझे?
आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, 25 मार्च रोजी इनोव्हा गाडीतून पीपीई किट घालून बाहेर येणारी एक व्यक्ती सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे. अंगावर पीपीई किट असलेल्या व्यक्ती आणखी कोणी नसून सचिन वाझे असल्याचा दावा एनआयएच्या एका अधिकाऱ्याने केलेला आहे. दरम्यान, या प्रकरणातील मुख्य साक्षीदार यांपैकी एक असलेल्या हिरेन मनसुख याचा मृतदेह मुंब्रा येथील रेतीबंदर या ठिकाणी आढळून आल्यानंतर या संदर्भात एटीएसकडून तपास केला जात आहे. तर मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकांच्या संदर्भात राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून तपास केला जात आहे. हिरेन मनसुख यांच्या मृत्यूच्या संदर्भात आता राष्ट्रीय तपास यंत्रणा तपास करणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आलेला आहे. याबरोबरच सचिन वाझे यांच्या आतापर्यंत झालेल्या चौकशीमध्ये मुंबई पोलीस खात्यातील आणखी काही पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांची चौकशी झालेली आहे. यासंदर्भात आणखीन काही पोलिसांना अटक केली जाऊ शकते असही समोर येत आहे.
हेही वाचा - 'त्या' मर्सिडिज सोबत भाजप पदाधिकाऱ्याचा फोटो; सचिन सावंतांनी मागितला खुलासा
हेही वाचा - अँटिलिया प्रकरण : मुख्यमंत्री-गृहमंत्र्यांमध्ये बैठक सुरू; मुंबई पोलीस आयुक्तांचं काय होणार?