मुंबई : दाऊद इब्राहिम आणि त्याच्या साथीदारांच्या डी-कंपनी प्रकरणातील संशयित आरिफ अबुबकर शेख याला मे महिन्यात एनआयएने अटक केली. नंतर न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे. हाच आरिफ शेख डी कंपनी मुंबईत सक्रिय ठेवण्यासाठी काम करत होता. डी-कंपनी अनेक दहशतवादी संघटनांच्या संपर्कात (D Company links with terrorist organizations) असून देशात मोठा दहशतवादी कट राबविण्याच्या तयारीत असलेल्या आरिफ शेखने नुकताच जामीनासाठी अर्ज केला होता. मात्र एनआयएने त्याला विरोध (NIA Action Against D Company) केला. राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) केलेल्या तपासानुसार दाऊद टोळीकडून मुंबई व इतर प्रमुख शहरांमध्ये दहशतवादी हल्ले करण्यासाठी हवालाच्या माध्यमातून विदेशातून पैसे पुरवले गेले. तसेच दाऊद टोळीने राजकीय नेते आणि व्यावसायिकांसह प्रतिष्ठित व्यक्तींवर हल्ले करून भारतात दहशत निर्माण करण्यासाठी एक विशेष गट तयार केला होता. या कट कारस्थानासाठी मुंबईतूनच पैसा गोळा करण्यात येत होता. त्यासाठी दाऊद टोळी खंडणी वसूल करत होती. तीन दशकांपूर्वी मुंबई आणि देश सोडून पळालेला कुख्यात दाऊद इब्राहिम व त्याचा हस्तक छोटा शकील आज देखील मुंबईत त्यांच्या साथीदारांमार्फत सक्रिय आहेत. महत्त्वाचे म्हणजे या कुख्यात गुंडांचे मुंबईतील कारभार कोणामार्फत सुरू आहेत याविषयी जाणून घेऊया माहिती.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या सलीम कुरेशी ऊर्फ सलीम फ्रुट आणि आरिफ अबुबकर शेख ऊर्फ आरिफ भाईजान दाऊद टोळीचे मुंबईतील कामकाज सांभाळत होते. मात्र ते आता अटकेत आहेत. आरिफ भाईजान हा पश्चिम उपनगरापासून अगदी विरारपर्यंतचे दाऊद टोळीचे कामकाज पाहत आहे. आरिफ हा छोटा शकीलची धाकटी बहीण फेहमिदा हिचा पती आहे. तिचे २०२० मध्ये निधन झाले. गुजरातचे माजी गृहमंत्री हरेन पंड्या यांच्या हत्येनंतर २००६ मध्ये आरिफसह इतर नऊ जणांना दुबईतून हद्दपार करण्यात आले होते. त्यानंतर त्यांची रवानगी भारतात करण्यात आली. तेव्हापासून खंडणीच्या गुन्ह्यांमध्ये आरिफ भाईजानचे नाव अधूनमधून संशयित म्हणून चर्चेत येत असे. मिरा रोड येथील जमिनीच्या वादातून व्यावसायिकाला धमकावल्याप्रकरणी ऑक्टोबर महिन्यात आरिफ भाईजानला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनेही अटक केली होती.
सलीम फ्रुट कोण आहे? : दक्षिण आणि मध्य मुंबईतील दाऊद टोळीचे कामकाज सलीम फ्रूट हाताळत असल्याची चर्चा केली जाते. सलीमचा फळ विक्रीचा कौटुंबिक व्यवसाय होता. त्यामुळे सलीम फ्रुट नावाने त्याला ओळखले जाते. त्यालाही २००६ मध्ये यूएईमधून हद्दपार करण्यात आले होते. छोटा शकीलसह त्याला खंडणीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली होती. त्याप्रकरणी मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. तो २०१० पर्यंत तुरुंगात होता. नुकतीच, ऑक्टोबर महिन्यात व्यावसायिकाला धमकावल्याप्रकरणी त्यालाही गुन्हे शाखेने त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.
एनआयएने केली कारवाई ? : एनआयएने मे महिन्यात आरिफ अबुबकर शेख ऊर्फ आरिफ भाईजान, शब्बीर अबुबकर शेख आणि मोहम्मद सलीम कुरेशी ऊर्फ सलीम फ्रूट या तिघांना दहशतवादासाठी पैसा पुठवठा केल्याप्रकरणी प्रकरणात अटक केली होती. याप्रकरणी सत्र न्यायालयात दाऊद टोळीविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. आरोपपत्रात गुन्ह्यांत सहभागी आरोपी दाऊद इब्राहिम, छोटा शकील यांच्यासह अटक आरोपी आरिफ अबुबकर शेख ऊर्फ आरिफ भाईजान, शब्बीर अबुबकर शेख आणि मोहम्मद सलीम कुरेशी ऊर्फ सलीम फ्रूट यांच्या नावांचा समावेश आहे. एनआयएने यावर्षी फेब्रुवारीमध्ये दाऊद इब्राहिम व त्याच्या साथीदारांविरुद्ध नव्याने गुन्हा दाखल करून अधिक तपास सुरू ठेवला. त्यातून दाऊद टोळीच्या गंभीर कृत्यांची माहिती उघड झाली आहे. याप्रकरणी आरोपींविरुद्ध बेकायदा कारवाया प्रतिबंधक कायदा (यूएपीए) तसेच मोक्का कायद्याच्या विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले होते.
सलीम फ्रुट आणि आरिफ भाईजान यांचा उदय कसा झाला ? : दाऊद इब्राहिमने भारत देश सोडल्यानंतर त्याची बहीण हसिना पारकर मुंबईतील दाऊद टोळीचे सत्ताकेंद्र स्थानी विराजमान झाली. व्यावसायिक वादातील मध्यस्थीतून अनेकांना धमकावल्याचे तिच्यावर आरोप झाले होते. मात्र २०१४मध्ये तिच्या मृत्यूनंतर तिची जागा छोटा शकीलचे नातेवाईक आरिफ भाईजान व सलीम फ्रुट यांनी घेतली. त्यासाठी दोघेही छोटा शकीलच्या नावाचा वापर करत असून मध्यस्थीतून धमकावल्याच्या प्रकरणातही त्यांचे नाव यापूर्वीही आले आहे. मात्र, दाऊदच्या आणि डी कंपनीच्या भीतीने अनेकांनी तक्रार केली नाही. आता एनआयएने दोघांनाही अटक केल्यानंतर अनेक तक्रारदारांनी पुढे येऊन दोघांविरोधात मुंबई पोलिसांकडे तक्रारी दाखल केल्या आहेत.