मुंबई : राष्ट्रीय तपास संस्था एनआयएने मुंबई पोलिसांना एका संशयित व्यक्तीच्या हालचालीबाबत सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. संशयित व्यक्तीच्या हालचाली या संशयास्पद आहेत असे सांगितले आहे. एनआयएने मुंबई पोलिसांना ईमेलद्वारे ही माहिती दिली आहे. सर्फराज मेमन नावाचा व्यक्ती हा ईमेलद्वारे घातक आहे असे त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे आता मुंबई पोलिसांची डोकेदुखा वाढणार आहे. त्यांना आणखी सतर्क रहावं लागणार आहे.
सर्फराज मेमन नावाचा व्यक्ती धोकादायक : सर्फराज मेमन नावाचा व्यक्ती शहरात पोहोचला आहे. त्याबाबत एनआयएने पोलिसांना सतर्क राहण्यास सांगितले आहे. एनआयएच्या ईमेलमध्ये सर्फराज मेमन हा भारतासाठी धोकादायक आहे असा उल्लेख करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांच्या सूत्रांच्या माहितीनुसार, मध्य प्रदेशातील रहिवासी असलेल्या मेमनने चीन, हाँगकाँग आणि पाकिस्तानमध्ये दहशतवादी कारवायांचे प्रशिक्षण घेतल्याची माहिती एनआयएने दिली आहे.
सर्व माहिती पोलिसांकडे सुपूर्द : एनआयएने त्या व्यक्तीचे आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स आणि पासपोर्ट असे सर्व कागदपत्र मुंबई पोलिसांना ईमेलद्वारे पाठवले आहेत. हा ईमेल मिळाल्यापासून तपास यंत्रणा सतर्क झाल्या आहेत, असे सूत्राने सांगितले आहे. मुंबई पोलिसांनी या प्रकरणाची माहिती इंदूर पोलिसांनाही दिली आहे. फेब्रूवारी महिन्याच्या सुरूवातीच्या आठवड्यात एनआयएला एका अज्ञात व्यक्तीकडून मेल प्राप्त झाला होता. ज्यात मुंबईला एका व्यक्तीकडून धोका असल्याचा दावा केला गेला होता.
धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलला फोन : मुंबईत दहशतवादी हल्ला करण्याची धमकी देणारा तालिबानी सदस्य असावा, असे पोलीस सूत्रांनी सांगितले होते. सूत्रांच्या म्हणण्यानुसार, एनआयएने मुंबई पोलिसांना या घडामोडीची माहिती दिली होती. त्यानंतर महाराष्ट्रातील विविध शहरांना अलर्टवर ठेवण्यात आले होते. गेल्या महिन्यात मुंबईतील धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलला धमकीचा फोन आला होता. जिथे एका अज्ञात इसमाने फोनवर शाळा उडवून देण्याची धमकी दिली होती. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये एचएन रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलमध्ये धमकीचा कॉल आला होता. ज्या दरम्यान अज्ञात कॉलरने हॉस्पिटल उडवून देण्याची धमकी दिली होती. अंबानी कुटुंबाला जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या होत्या.
हाजी अली दर्ग्यावर हल्ल्याचा फोन : दहशतवादी हे मुंबईतील हाजी अली दर्ग्यावर हल्ला करणार आहेत, असा फोन काही दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला आला होता. या फोननंतर तारदेव पोलीस घटनास्थळी पोहोचले होते. बीडीडीएस, कॉन्व्हेंट व्हॅनही घटनास्थळी दाखल झाली होती. पोलिसांच्या टीमने हाजी अली दर्ग्याच्या आत आणि बाहेर कसून तपासणी केली होती. परंतु, त्यांना तिथे पोलिसांना काहीच सापडले नव्हते. कॉल करणारा व्यक्ती मानसिक रुग्ण असल्याचे त्यांनी आढळून आले होते. ज्या नंबरवरून पोलिसांना फोन आला त्या नंबरवर पुन्हा फोन केला असता, त्याचा फोन बंद येत होता. तो कोण आहे? कॉल करण्यामागील हेतू काय आहे? याची माहिती घेण्यासाठी पोलिसांकडून तांत्रिक मदत घेतली गेली होती.