मुंबई - लोकसभेत मोदींची लाट होती, देशातील जनतेने दिलेला कौल मान्य आहे. आगामी विधानसभेसाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, राज्यात यापुढे आघाडीचाच मुख्यमंत्री होणार असल्याचा विश्वास राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी व्यक्त केला. ते मुंबईत आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या २० व्या वर्धापननिमित्त काढण्यात आलेल्या जलदिंडी प्रसंगी बोलत हेाते.
अजित पवार पुढे म्हणाले, राज्यात भाजप आणि शिवसेनेचा पराभव करता येईल यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. भाजपच्या बैठकीत महाराष्ट्रात भाजपचा मुख्यमंत्री व्हावा, असे सांगितले. आम्हाला वाटते आता आघाडीचाच मुख्यमंत्री व्हायला पाहिजे, यासाठी राज्यातील सर्व समविचारी पक्षांनी एकत्र घेऊन चालावे, यासाठी या समविचारी पक्षांनी आत्तापर्यंत आपल्याला सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याचे पवार म्हणाले.
राज्यात दुष्काळाची परिस्थिती अत्यंत भयावह असून सरकारकडून अनेक ठिकाणी चारा छावण्या बंद केल्या जातात. त्या छावण्या बंद करू नये, ही आमची मागणी आहे. दुसरीकडे तरुणांमध्ये बेरोजगारी वाढत आहे, त्यासाठी सत्ताधारी पक्षाने काहीही ठोस पाऊले उचचले नाहीत. आरक्षणच्या नावाखाली राज्यातील लोकांना भुलभुलया करण्याचे काम या सरकारने केले आहे, भावनिक मुद्दा हातात घेऊन आणि हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेऊन जनाधार मिळवण्याचा त्यांचा केविलवाणा प्रयत्न असल्याचेही पवार म्हणाले.