मुंबई - पूर्व द्रुतगती मार्गावरील घाटकोपर येथे प्रचंड वाहतूक कोंडी होते. ठाण्यातून घाटकोपर आणि पुढे अंधेरीकडे जाणाऱ्याना या वाहतूक कोंडीला तोंड द्यावे लागते. आजपासून त्यांची घाटकोपर पूर्व द्रुतगती मार्गावरील घाटकोपर-अंधेरी जोडरस्त्यावरील नवा 693 मीटरचा उड्डाणपूल खुला करण्यात आला आहे. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या उड्डाणपुलाचे उद्घाटन करण्यात आले. यामुळे आता या वाहतूक कोंडीतून घाटकोपरवासीयांची आणि ठाण्यावरून येणाऱ्यांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे.
हेही वाचा - मेट्रो कारशेडच्या नावाने भाजपने मुंबईकरांना फसवले - सचिन सावंत
असा आहे प्रकल्प -
मुंबईकडून ठाण्याच्या दिशेने जाण्यासाठी घाटकोपर-अंधेरी जंक्शनवर तीन मार्गिकेचा उड्डाणपूल आहे. मात्र, ठाण्यावरून मुंबईच्या दिशेने येण्यासाठी घाटकोपर-अंधेरी जंक्शन असा उड्डाणपूल नसल्याने येथे सिग्नल लागतो. परिणामी येथे मोठी वाहतूक कोंडी होते. त्यामुळे तीन मार्गिकेचा दक्षिण दिशेने जाणारा उड्डाणपूल बांधण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला. 33 कोटी 4 लाख खर्च करत दोन वर्षांत हा पूल पूर्ण करत तो आज रहदारीसाठी खुला करण्यात आला आहे. या उड्डाणपुलाची लांबी 693 मीटर इतकी असून रुंदी 12 मीटर इतकी आहे.
कांजूरची जागा राज्य सरकारचीच - एकनाथ शिंदे
कांजूरच्या जागेवरून वाद सुरूच आहे. या अनुषंगाने ही जागा सरकारचीच असल्याचा पुनरुच्चार नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे.