मुंबई : विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे ( Deputy Speaker Neelam Gorhe ) यांनी पक्षांतर केल्यामुळे त्यांना या पदावरून काढून टाकावेवे, अशी मागणी राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या ( Maharashtra Assembly Monsoon Session 2023 ) पहिल्या दिवसापासून विरोधकांनी लावून धरली होती. यावर तत्कालीन तालिका अध्यक्ष निरंजन डावखरे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष चर्चा झाल्यानंतर हा निर्णय राखून ठेवण्यात आला होता. आज तालिका अध्यक्ष निरंजन डावखरे यांनी यावर निर्णय देताना उपसभापती पदावर नीलम गोऱ्हे या कायम राहतील, असे सांगत स्पष्टीकरण दिले आहे.
कुठल्याही कायद्याचे उल्लंघन नाही : उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या पात्रतेप्रकरणी निर्णय देताना तालिकाध्यक्ष निरंजन डावखरे म्हणाले की, कायद्यानुसार उपसभापतींना अपात्र ठरवता येणार नाही. नीलम गोऱ्हे यांनी पक्षांतर केले म्हणून विरोधकांनी त्यांना पदावरून हटविण्याची विनंती केली होती. तसेच त्यांना अपात्र करण्याची मागणी विधान परिषदेत विरोधकांनी केली होती. परंतु १० व्या शेड्यूलनुसार उपसभापती यांच्यावर अशी कारवाई करता येणार नाही. तसेच त्या अजूनही ओरिजनल शिवसेना पक्षातच असल्याने कुठल्याही पद्धतीने त्यांनी नियमांचे उल्लंघन केले नसल्याने त्या उपसभापती पदावर कायम राहतील, असे डावखरे म्हणाले.
विरोधकांचा हल्लाबोल : उद्धव ठाकरे गटाचे आमदार नीलम गोऱ्हे, मनिषा कायंदे, विप्लव बजोरिया यांनी ठाकरे गटाला रामराम करत काही दिवसांपूर्वी शिंदे गटात प्रवेश केला होता. या तिघांनी पक्ष सोडल्यानंतर उबाठा गटाने त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. तसेच त्यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी विरोधकांनी लावून धरली होती. विशेष म्हणजे उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी पक्षांतर केल्यामुळे त्यांना या पदावर राहण्याचा अधिकार नाही. त्यांना या पदावरून बडतर्फ करण्यात यावे, अशी मागणी विरोधकांनी पहिल्या दिवसापासून लावून केली होती. याच पार्श्वभूमीवर उबाठा गटाचे आमदार अनिल परब प्रतिक्रिया देताना म्हणाले होते की, काही दिवसांपूर्वी नीलम गोऱ्हे यांनी पक्षाचे सदस्यत्व सोडलेले आहे. त्यामुळे कायद्याच्या दहाव्या शेड्युलमध्ये २ अ नुसार अपात्रतेची तरतूद आहे. त्यामुळे या पदावर राहण्यास गोऱ्हे पात्र नाही, असे सांगत परब यांनी हल्लाबोल केला होता.
काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस : उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर सभागृहात बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, सर्वोच्च न्यायालयाने ओरिजनल राजकीय पक्ष कोणता हे ठरवण्याचे अधिकार यापूर्वीच विधानसभेच्या अध्यक्षांना दिले आहेत. शिवसेनेत नीलम गोऱ्हे यांनी प्रवेश केला, असे म्हणता येणार नाही. कारण नीलम गोऱ्हे या ओरिजनल शिवसेना राजकीय पक्षाकडे आल्या आहेत. तसेच इतरांनीही ओरिजनल राजकीय पक्ष म्हणजे शिंदे यांच्या शिवसेनेत आले पाहिजे. तसेच ओरिजनल शिवसेना हा राजकीय पक्ष शिंदे यांच्याकडे आहे. नीलम गोऱ्हे या कायदा मानणाऱ्या, समजणाऱ्यांपैकी आहेत.
हेही वाचा - Monsoon Session 2023: खारघर दुर्घटने प्रकरणी सभागृहात आरोप प्रत्यारोप