मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी विधानसभा निवडणुकीत युवकांना सर्वाधिक संधी देण्यात येणार असल्याचे सांगितले होते. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीच्या मैदानात राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून राज्यभरात तब्बल १५ तरुणांना उभे केले जाणार आहेत. हे तरुण राज्यात मराठवाडा, विदर्भ तसेच शहरी भागातील असतील, अशी माहिती राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.
पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यातील १५ युवकांची नावे मला द्या मी त्यांना उमेदवारी देतो, असे सांगितलेले आहे. युवकांच्या हातात राज्य सुरक्षीत राहील. यामुळेच त्यांनी ही जबाबदारी आमच्यावर सोपवली आहे. या पार्श्वभूमीवर आम्ही राज्यभर फिरत आहोत. आम्ही जागा ठरवल्या असल्या तरी त्यातील लढून जिंकण्याच्या जागा आम्ही मागणार आहोत. युवकांचा पदाधिकारी, त्याची काम करण्याची शक्ती, निवडून येण्याची क्षमता पाहून आम्ही तशा नावांची यादी तयार करत आहोत. येत्या आठएक दिवसात या नावांची यादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना देणार असल्याचे शेख यांनी सांगितले. खात्री आहे की, आम्ही दिलेल्या तरुणांना ते उमेदवारी देतील, असा विश्वास देखील त्यांनी यावेळी दर्शवला.
बेरोजगारीच्या प्रश्नासाठी वर्षा बंगल्यावर आंदोलन करणार -
बेरोजगारीच्या प्रश्नावर आम्ही ११ आंदोलने केली आहेत. या सरकारने बेरोजगाराच्या प्रश्नावर केवळ झोपेचे सोंग घेतलेले आहे. आमची आंदोलने सुरू होतात त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आम्ही मेगा भरती करणार असल्याचे सांगतात. मात्र, राज्यात आज बेरोजगारी भयंकर आहे. डी.एड केलेली अडीच लाख विद्यार्थी बेरोजगार आहेत. वर्षभरापासून केवळ यांच्याकडून अर्ज भरून घेतला जातो. मात्र, पुढे काही केले जात नाही. १२ हजार रिक्त असलेल्या जागा ते भरत नाहीत. शाळांमध्ये शिक्षक नसल्याने गोरगरीबांची मुले अशीच शिकत आहेत. त्यामुळे हे कुंभकर्णासारखे झोपेचे सोंग घेणारे सरकार आहे. या सरकारला जागे करण्यासाठी आम्ही ठाण्याला ढोल वाजवा आंदोलन केले, तरीही सरकारला जाग आली नाही. त्यामुळे हे सरकार जोपर्यंत राज्यात दीड लाख जागांवर प्रत्यक्ष भरती करत नाही तोपर्यंत आमचा लढा चालूच राहील. येणाऱ्या काळात आम्ही मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर जाऊन ढोल वाजवा आंदोलन करून या झोपेचे सोंग घेतलेल्या कुंभकर्णी सरकारला जागे करू. गरज पडली तर आमच्यावर कितीही गुन्हे दाखल झाले तरी आम्ही बेरोजगारांच्या प्रश्नावर लढत राहू, असा इशाराही मेहबूब शेख यांनी दिला.