मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसनेच फडणवीस सरकारला वाचविले असल्याचा गौप्यस्फोट विधासभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनी केला. तेराव्या विधानसभा अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी बागडेंनी आपल्या भावनांना वाट मोकळी करुन देताने हे वक्तव्य केले. राष्ट्रवादीच्या आमदारांनी पाठिंबा देऊन 'फडणवीस' सरकारचा विश्वास दर्शक ठराव जिंकल्याचे सांगितले. त्यांच्या या वक्तव्यामुळे सर्व पक्षीय बाकांवरुन आश्चर्य आणि हास्यकल्लोळ उमटला होता.
विधानसभेत शेवटच्या दिवशी अभिनंदन ठरावाला उत्तर देताना बागडे म्हणाले, विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक जिंकण्यासाठी मी स्वत: उद्धव ठाकरेंना फोन करुन शिवसेनेचे अध्यक्षपदाचे उमेदवार विजय औटींचा अर्ज माघारी घ्यायला लावला होता. यावेळी उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंच्या विरोधी पक्षनेते पदासाठी मदत करण्याचे आश्वासन दिल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
बागडे म्हणाले, संख्याबळानुसार २०१४ मध्ये विशेष आधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधानसभा अध्यक्षपदावर माझी निवड झाली. अध्यक्ष निवड, विश्वासदर्शक ठराव आणि विरोधी पक्षनेता निवड असा क्रम ठरला होता. मात्र, मी हा क्रम बदलला आणि आधी विरोधी पक्ष नेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड झाली. त्यानंतर मी विश्वासदर्शक ठराव मतदानासाठी पुढे आणला. त्यावेळी विरोधक (शिवसेना आणि काँग्रेस) बाहेर गेले होते. सभागृहात आल्यावर त्यांनी उभं राहून मतदान मागितले. परंतु त्याआधीच आवाजी मतदानाने फडणवीस सरकारचा विश्वासदर्शक ठराव मंजूर झाला होता. राष्ट्रवादीचे आमदार सभागृहातच बसून होते, आणि राष्ट्रवादीने यापूर्वीच सरकारला बिनशर्त पाठिंबा दिला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. सत्ताधारी पाठबळ मोजून १२२ सदस्यांचे होते, असे सांगताच विधानसभेतील सर्व सदस्यांनी आश्चर्य व्यक्त केले, याबरोबरच सभागृहात एकच हास्यकल्लोळ सुरू झाला.
मी विरोधकांना थोडं झुकतं माप दिलं-
१३ व्या विधानसभेत विरोधकांचा काळ कठीण होता, असे सांगताना बागडे म्हणाले, पंधरा वर्षे सत्तेत राहून मंत्री, मुख्यमंत्री, माजी विधानसभा अध्यक्ष अशी दिग्गज लोक विरोधात होते. कमी संख्याबळ विरोधाची सवय नसल्याने ते सुरुवातीला चाचपडत होते. अर्थात मी विरोधकांना थोडे झुकतं माप दिलं. प्रश्नावर चर्चा सुरू असताना जाणीवपूर्वक मंत्र्यांना बोलण्याला संधी दिली. त्यामुळे प्रश्नांना न्याय मिळून चांगली चर्चा झाल्याचेही त्यांनी नमूद केले.
पाच वर्षात तीन विरोधीपक्ष नेते पाहिले-
पाच वर्षात तीन विरोधी पक्षनेते या विधानसभेने बघितले. त्यापैकी पहिल्या दोघांनी मुख्य प्रवाहात सामील होणे पसंत केले असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. विधानसभा गठीत झाल्यानंतर पहिल्या अधिवेशनात मा. एकनाथजी शिंदे हे विरोधी पक्षनेते पदी होते. नंतर शिवसेना पक्षाने भाजप सोबत युती करण्याचा निर्णय घेतल्यावर ते मंत्री झाले. १३ व्या विधानसभेच्या या अखेरच्या अधिवेशनात राधाकृष्ण विखे-पाटील हे विरोधी पक्षनेते पदाचा त्याग करुन भाजपात प्रवेशकर्ते झाले आणि ते आता गृहनिर्माण मंत्रीपदाचा कार्यभार सांभाळत आहेत. विजयराव वडेट्टीवार हे, या अखेरच्या अधिवेशनात तिसरे विरोधी पक्षनेते ठरले आहेत.