मुंबई - 7 फेब्रुवारी 2019 ला पार्थ अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली मुंबई राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने राज्यपाल विद्यासागर राव यांची भेट घेऊन मुंबई विद्यापीठातील कल्याण उपकेंद्र चालू करण्यासंदर्भात मागणी केली होती. या मागणीला यश मिळाले आहे. 2019-20 पासून नवीन अभ्यासक्रमांना कल्याण उपकेंद्रात सुरुवात होणार आहे. कल्याण आणि जवळील दुर्गम भागातील अधिकाधिक विद्यार्थ्यांना हे केंद्र सोयीचे होणार आहे, असे मुंबई राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष अमोल मातेले म्हणाले.
नावीन्यपूर्ण अभ्यासक्रमाबरोबरच औद्योगिक गरजा लक्षात ठेवुन कुशल मनुष्यबळ तयार करण्यासाठी मुंबई विद्यापीठाच्या कल्याण उपकेंद्रा मधील स्कूल ऑफ इंजीनियरिंग अँड सायन्स मध्ये प्रवेश प्रक्रीया सुरु होणार आहे. 2019-20 या शैक्षणिक वर्षासाठी नवीन अभ्यासक्रम आणि विद्यार्थी प्रवेश प्रक्रिया सुरु होणार आहे. यामध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी एम टेक कम्प्युटर इंजिनीरिंग,एम टेक केमिकल इजिनिअरिंग टक्नॉलॉजी, एम टेक ट्रांसपोर्टेशन इंजीनियरिंग, एमटेक आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, एमएस्सी इन ओशनोग्राफी हे अभ्यासक्रम असणार आहेत. याच बरोबर कल्याणच्या उपकेंद्रात पीएचडीचे संशोधन केंद्र सुरु करण्यात येणार आहे. शुक्रवारी झालेल्या विव्दत परिषदेच्या बैठकीत या सर्व अभ्यासक्रमांना मंजुरी देण्यात आली आहे.
स्पर्धेच्या युगात औद्योगिक क्षेत्रातील वाढत्या गरजा लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना अधिकाधिक व्यावसायिक अभ्यासक्रमाना प्रवेश देवून रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी विद्यापीठाने उपकेंद्रात अभ्यासक्रमांची सुरुवात करण्याचे ठरवले आहे. बदलत्या गरजेनुसार कॅम्पुटर आर्किटेक्चर मध्ये सुधारणा कॉम्प्युटर हार्डवेअर सॉफ्टवेअर अल्गोरिदम आणि डेटा व्यवस्थापन, आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, क्लाऊड कम्प्युटिंग, मशीन लर्निंग, बिग डेटा, इमेज प्रोसेसिंग प्रगत ऑपरेटिंग सिस्टम अशा विविध वैशिष्ट्यपूर्ण क्षेत्रातील ज्ञान विद्यार्थ्यांना मिळावे यासाठी विद्यापीठाने या अभ्यासक्रमाची निवड केली आहे.