मुंबई : शरद पवार राष्ट्रीय राजकारणात गेल्या (Sharad Pawar Retirement) पन्नास वर्षांपासून कार्यरत आहेत. केंद्र सरकारच्या विरोधात एकत्र आलेल्या विविध पक्षांमध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा समावेश आहे. ते विरोधकांच्या आघाडीतील महत्त्वाचे नेते आहेत. राज्यात राष्ट्रवादीमध्ये मोठी फूट पडली (Sharad Pawar Retire 4 August) आहे. अशा परिस्थितीत शरद पवार (NCP Crisis) हे सक्रिय राजकारणातून निवृत्त होणार अशा चर्चा राज्यात दोन दिवसांपासून सुरू आहेत.
शरद पवार निवृत्त होणार नाहीत : राजीनामा दिल्यानंतर शरद पवार राष्ट्रवादीच्या फुटलेल्या गटाशी चर्चा करुन राष्ट्रीय लोकशाही आघाडीला अप्रत्यक्षरीत्या मदत करतील असे बोलले जात आहे. मात्र, या सर्व शक्यतांना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तसेच काही ज्येष्ठ राजकीय विश्लेषण यांनी नकार दिला आहे. शरद पवार सध्या तरी राजकीय निवृत्ती घेण्याच्या मनस्थितीत नसून ते पुन्हा संघटन बांधण्याच्या मनस्थितीत आहेत, अशा प्रतिक्रिया या जाणकारांनी व्यक्त केल्या आहेत.
शरद पवारांच्या निवृत्तीच्या फक्त चर्चा : शरद पवार यांच्या निवृत्तीबाबत बोलताना ज्येष्ठ राजकीय विश्लेषक अनिकेत जोशी म्हणाले, राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार निवृत्त होणार असल्याची चर्चा खरच सुरू झाली आहे का? असा प्रश्न माझ्या मनात उभा राहतो. 4 ऑगस्टला शरद पवार निवृत्त होणार अशा चर्चा रंगल्या आहेत. मात्र, चार तारखेला महाराष्ट्र विधानसभेचे अधिवेशन संपणार आहे. त्यामुळे ही घटना वगळता राज्यात कोणतीही महत्वाची घटना दिसत नाही. शरद पवार यांनी यापुढे राज्यसभा लढवणार नसल्याचे सांगितले होते. 2009 मध्ये त्यांनी लोकसभा लढवणार नसल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर ते राजकारणातून निवृत्त होवून संस्थात्मक कामांकडे लक्ष देतील असे त्यांनी स्वतः सांगितले होते.
शरद पवार आता पूर्ण निवृत्तीची घोषणा करतील, अशी शक्यता नाही. दुसरी गोष्ट म्हणजे राष्ट्रीय राजकारणात शरद पवारांना विरोधी पक्षांच्या आघाडीत महत्त्वाचे स्थान आहे. 24व्या लोकसभा निवडणुकीपूर्वी शरद पवार निवृत्ती जाहीर करतील, अशी शक्यता नाही - अनिकेत जोशी, राजकीय विश्लेषक
जाणीवपूर्वक अफवा : शरद पवार 4 तारखेला निवृत्त होत असल्याच्या अफवा जाणीवपूर्वक सर्वत्र पसरवल्या जात आहेत. पवार हे लढवय्ये आहेत, ते राजकारणातून कधीच निवृत्त होऊ शकत नाहीत. या अफवा उठवणारी मंडळी अल्पबुद्धीची आहेत. अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे सचिव दत्ताजीराव देसाई यांनी व्यक्त केली आहे.
पवार मोदी लाटेवर स्वार होतील : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार 4 ऑगस्टला राजीनामा देणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. यावर ज्येष्ठ राजकीय विश्लेषक विवेक भावसार ईटीव्हीशी बोलतांना म्हणाले, शरद पवार राजीनामा देतील, अशी कोणतीही शक्यता नाही. जेव्हा-जेव्हा राष्ट्रवादीवर संकट आले, पक्ष फुटला तेव्हा पवार अधिक जोमाने पुन्हा संघटनात्मक कामाला लागले, असे भावसार म्हणाले.
नरेंद्र मोदींना रोखण्यासाठी तिसरी आघाडी देशात स्थापन झाली आहे. अशा वेळी तिसऱ्या आघाडीतील कोणत्याही पक्षाचा नेता देशाचा पंतप्रधान होऊ शकतो. मात्र, शरद पवार पंतप्रधान होतील असे म्हणता येणार नाही - विवेक भावसार, राजकीय विश्लेषक
तर..राष्ट्रवादीत फुट पडली नसती : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांचा आहे. त्यांनीच या पक्षाला उभे केले आहे. अजित पवारांनी आता पक्ष सोडला असला, तरी शरद पवारांनी अद्याप हार मानलेली नाही. शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांच्याकडे पक्षाचे कार्याध्यक्षपद सोपवल्यामुळे पक्षात फूट पडल्याचे बोलले जात आहे. कोणताही नेता आपल्या पुतण्यापेक्षा आपल्या मुलाला किंवा मुलीला राजकारणात सक्रिय करतो हा देशाचा इतिहास आहे. त्यामुळे त्यांनी काही चुकीचे केले, असे मला वाटत नसल्याचे भावसार म्हणाले. त्यांची राजकीय खेळी कदाचित चुकली असेल, अजित पवार यांना मोठे केले असते, तर राष्ट्रवादीत फुट पडली नसती असे मत देखील भावसार यांनी व्यक्त केले.
हेही वाचा -