मुंबई : NCP President Row : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावर दोन्ही गटाकडून दावा केला जातोय. राष्ट्रवादीचे खरे अध्यक्ष हे शरद पवारच असल्याचा दावा पुन्हा एकदा आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी मंगळवारी केला होता. यावरुन उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar Reply Sharad Pawar Faction) यांनी पलटवार केलाय. निवडणूक आयोगानं सांगितल्यानंतर लोकांमधील संभ्रम दूर होईल, असंही ते म्हणाले.
शरद पवार-अजित पवार गटाचा दावा : शरद पवार यांच्या राष्ट्रवादी अध्यक्षपदाबाबत सोमवारी अजित पवार गटाचे कार्याध्यक्ष प्रफुल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी प्रश्नचिन्ह निर्माण केलं होतं. त्यावर मंगळवारी शरद पवार गटाकडून पत्रकार परिषद घेऊन उत्तर देण्यात आलं. या पत्रकार परिषदेला शरद पवार आणि जितेंद्र आव्हाड उपस्थित होते.
अजित पवार गटाला आव्हान : जितेंद्र आव्हाड यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील झालेल्या पक्षांतर्गत निवडणुकीची कागदपत्रं दाखवत, सर्व कागदपत्रं केंद्रीय निवडणूक आयोगाला सादर केल्याचं सांगितलं. तर अशा प्रकारची कागदपत्रं त्यांनी (अजित पवार) दाखवावेत, असं आव्हान जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार गटाला दिलंय. अजित पवार हे पक्षाचे अध्यक्ष असल्याचा दावा प्रफुल पटेल यांनी केला होता. सदरचा दावा खोडून पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हेच असल्याचा दावा आव्हाड यांनी केलाय.
निवडणूक आयोगाचा निर्णय मान्य : जितेंद्र आव्हाड यांच्या दाव्याला अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिलंय. याबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाकडं प्रस्ताव असून, ते प्रत्येकाचं मत ऐकून घेऊन निर्णय देतील. केंद्रीय निवडणूक आयोग जो निर्णय घेईल, तो आम्हाला मान्य आहे. तसंच आमची भूमिका तुम्हाला सांगण्यासाठी आम्ही बांधील नसल्याचंही त्यांनी सांगितलं. आमचा विषय केंद्रीय निवडणूक आयोगासमोर आहे. याबाबतचा निर्णय निवडणूक आयोग घेणार आहे. त्यामुळं जो काही पत्रव्यवहार करायचा, जी काय भूमिका मांडायची ती आम्ही वकिलांमार्फत मांडू. निवडणूक आयोगानं जाहीर केल्यानंतर लोकांमधील संभ्रम दूर होईल. त्यामुळं तुम्ही काळजी करू नका, असा सल्लाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जितेंद्र आव्हाड यांना दिलाय.
हेही वाचा -