मुंबई Supriya Sule On Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर दोन्ही गटातील नेत्यांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्याचे सत्र सुरूच आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली होती. या टीकेला उत्तर देताना अजित पवार रोहित पवारांना 'बच्चा' म्हणाले. यावरच आता खासदार (शरद पवार गट) सुप्रिया सुळे यांनी रविवारी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिलीय.
दादा सीनियर सिटीजन : खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, आमचा दादा रोहितपेक्षा वयानं खूप मोठा आहे. दादा हा रोहितचा काका आहे. थोडं काही बोललं तर रोहितनं कशाला मनाला लावून घ्यायचं. तसंच अजित दादांचं वय सध्या 65 तर रोहितचं वय 40 आहे. त्यामुळं काकांनी काही बोललं तर इट्स ओके. दादा आता सीनियर सिटीजन आहेत.
काय म्हणाले होते अजित पवार : अजित पवार मित्रमंडळ भाजपाच्या चिन्हावर लढणार अशी टीका रोहित पवार यांनी केली होती. तर अजित पवार यांनी या टीकेवर बोलताना रोहित अजून बच्चा आहे, असं म्हटलं होतं. तसंच रोहित पवारला माझे कार्यकर्ते उत्तर देतील, त्याला उत्तर द्यायला तो इतका मोठा झालेला नाही, असंही ते म्हणाले होते.
वय झालं तरी माणूस थांबत नाही : दरम्यान, अजित पवार गटाच्या मुंबई विभागाचा कार्यकर्ता संवाद मेळावा रविवारी (7 जानेवारी) कल्याणमध्ये पार पडला. यावेळी अजित पवार यांनी शरद पवार यांचं नाव न घेता टोला लगावला. ते म्हणाले की, वय झाल्यानंतर आपण थांबायचं असतं. काहीजण सत्तरी झाली की थांबतात. काहीजण वय 75 झालं की थांबतात. पण काहीजण ऐकायला तयार नाहीत. हट्टीपणा करतात. 80 वय झालं तरी माणूस थांबत नाही, असं ते म्हणाले होते. त्यामुळं अजित पवारांच्या या टीकेवरुनच सुप्रिया सुळे त्यांना 'सीनियर सिटीजन' म्हणाल्या असाव्यात, असं बोललं जातंय.
हेही वाचा -