मुंबई Supriya Sule : 2024 च्या लोकसभा निवडणुकीतील जागावाटपावरून I.N.D.I.A. आघाडीत संघर्षाचं चित्र आहे. विशेषतः महाराष्ट्रात सर्वाधिक समस्या भेडसावत आहेत. जागावाटपावरून काँग्रेस आणि शिवसेनेच्या ठाकरे गटात संघर्ष झाल्याचं वृत्त नुकतंच आलं होतं. मात्र जागांबाबत कोणताही वाद नसल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे.
काय म्हणाल्या सुप्रिया सुळे : "जर तुम्हाला वाटत असेल की जागावाटपावरून काही वाद सुरू आहेत, तर तसं काही नाही. सोनिया गांधी, उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात 15 दिवसांपूर्वी दिल्लीत बैठक झाली होती. त्या बैठकीत जागावाटपाबाबत अनेक गोष्टींचा खुलासा करण्यात आला. याबाबत आपल्याला (मीडिया) अद्याप काहीही सांगण्यात आलं नाही. येत्या 8-10 दिवसांत याबाबत माहिती दिली जाईल", असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
जयंत पाटील यांची प्रतिक्रिया : जागावाटपाच्या प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही भाष्य केलं. "दिल्लीत तिन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक झाली. तिन्ही पक्ष पुन्हा एकदा एकत्र बसतील आणि जागावाटपाचं चित्र येत्या एक-दोन दिवसांत स्पष्ट होईल. आठवडाभरात या सर्व गोष्टींवर निर्णय होईल", असं जयंत पाटील म्हणाले.
महाराष्ट्रात जागावाटपावर चर्चा : राज्यात लोकसभेच्या एकूण 48 जागा आहेत. भाजपा, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांची महायुती विरुद्ध काँग्रेस, शिवसेना (ठाकरे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) असा सामना आहे. भविष्यात वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीत सहभागी होऊ शकते. मात्र, याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही.
हे वाचलंत का :