मुंबई - लोकसंख्येत निम्म्यापेक्षा जास्त असलेल्या इतर मागास वर्गीय (ओबीसी) समाजाला विकासापासून वंचित ठेवून विकास होऊ शकणार नाही. महिला, ओबीसी, दलित, आदिवासी या सर्व कष्टकरी-अंगमेहनत करणाऱ्या समाजाचा विकास झाल्याशिवाय भारत महासत्ता होणार नाही. त्यामुळे राज्यातील ओबीसींची जनगणना करा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश गजभिये यांनी विधानपरिषदेत केली आहे.
यावेळी आमदार गजभिये म्हणाले की, ओबीसी हा बारा बलुतेदार, अठरा अलुतेदार, कारूनारू यांचा समाज आहे. हातात नानाविध कौशल्ये आणि अंगमेहनतीची तयारी असलेला हा समाज तीन हजार ७४३ जातीत विभागला आहे. त्याद्वारे ओबीसींचे शिक्षण, आरोग्य, गरिबी, रोजगार, निवारा याविषयीची माहिती जमा करता येईल. त्यातून ओबीसींच्या समकालीन जीवनमानाचे स्वरूप समजू शकेल. त्या माहितीच्या आधारे ओबीसींच्या सर्वांगीण विकासासाठी योजना आणि धोरणे आखता येतील. देशाच्या अर्थसंकल्पात त्यासाठी स्वतंत्र तरतूद करता येईल.