मुंबई - 'छत्रपती' या उपाधीवर संपूर्ण महाराष्ट्र मनापासून प्रेम करतो. त्या उपाधीमागे असणारा व्यक्ती महत्वाचा नसून, उपाधी महत्वाची वाटत असल्याचे म्हणत राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पवार यांनी उदयनराजेंना टोला लगावला. कोणतंही राजकारण न करता मी मनापासून अपेक्षा व्यक्त करतो की, जसा महाराष्ट्राचा प्रत्येक नागरिक छत्रपती या उपाधीचा मान ठेवतो तसाचं आपणही तो मान ठेवावा असा सल्ला त्यांनी भाजपला दिला आहे.
रोहित पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहली आहे. त्यामध्ये त्यांनी छत्रपती उपाधी महत्वाची असून, त्यामागचा व्यक्ती महत्वाचा नसल्याचे म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत उदयनराजे भोसले यांचा भाजपमध्ये प्रवेश होणार होता, मात्र, मोदी उपस्थित राहिले नाहीच. त्यांच्याऐवजी गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थिती उदयनराजेंचा भाजप प्रवेश झाला.
नेमके काय म्हणाले रोहित पवार
छत्रपती या उपाधीवर संपूर्ण महाराष्ट्र मनापासून प्रेम करतो. त्या उपाधी मागे असणारा व्यक्ती नाही, तर ती उपाधी मला महत्वाची वाटते. अशावेळी पक्षप्रवेशाचा कार्यक्रम मोदी साहेबांच्या उपस्थितीत होणार असल्याचं सांगण्यात येतं, पण तो कार्यक्रम एका नेत्यांच्या घराच्या पाठीमागे असणाऱ्या लॉनमध्ये आयोजित केला जातो. भारतीय जनता पक्षाला मला एकच सांगायच आहे, महाराष्ट्राचे नागरिक म्हणून व्यक्तीहून अधिक त्या उपाधीचा आम्ही मान ठेवला आहे. कोणतही राजकारण न करता मी मनापासून अपेक्षा व्यक्त करतो की, जसा महाराष्ट्राचा प्रत्येक नागरिक तो मान ठेवतो, तसाच आपणही तो मान ठेवावा', अशी पोस्ट रोहित पवार यांनी लिहिली आहे.