मुंबई - कालपर्यंत सेना-भाजप वेगवेगळे लढण्याची भाषा करत होते. परंतु राज्यात आणि देशात पराभव होईल, या भीतीने सेना-भाजपची युती झाली आहे. सेना-भाजपच्या आज झालेल्या युतीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी सेना भाजपवर निशाणा साधला.
आज दोघेही एकत्र आले असले तरी राज्यातील जनता यांना हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही, हे नक्की आहे असा विश्वासही नवाब मलिक यांनी यावेळी व्यक्त केला.
नवाब म्हणाले, शिवसेना-भाजप एकत्र आल्यानंतरही सरकारविरोधातील मतदानामध्ये विभाजन होणार नाही. १९९८ मध्ये सेना - भाजप सत्तेत असताना जनतेने काँग्रेसच्या आघाडीला ३८ जागांवर निवडून दिले होते. तीच परिस्थिती आज राज्यात आहे. त्यामुळे पुन्हा एकदा तीच परिस्थिती येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
'पहले मंदीर, फिर सरकार' असा नारा देणारी शिवसेना, तसेच चौकीदार चोर आहे. म्हणणार्या शिवसेनेला जनता जाब विचारल्याशिवाय गप्प बसणार नाही. हे दोघेही एकत्र आले असले तरी यांचा पराभव निश्चित असल्याचा विश्वास नवाब मलिक यांनी व्यक्त केला.