मुंबई - गुजरात निवडणुकांमध्ये भाजपला यश मिळताना दिसत आहे. मात्र, गुजरात राज्यात विधानसभा निवडणुकीत (Gujarat Election Result 2022) 'आप' पक्षाने केलेल्या लढतीचा फटका काँग्रेसला (Congress AAP Gujarat Election) बसला आहे. कॉंग्रेस आणि आप यांच्या मतांमध्ये विभागणी झाली. त्याचा फायदा भाजपला गुजरातमध्ये मिळाला आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil Gujarat Election Result) यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना दिली
राज्य सरकारवर टीका - सीमा भागातील लोकांचे प्रश्न सोडवण्यात हे सरकार अपयशी ठरले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास चुकीच्या पद्धतीने मांडला जात आहे. महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला जात आहेत. याबाबत जनतेमध्ये असंतोष आहे. त्यामुळेच महाविकास आघाडी सरकारच्यावतीने १७ डिसेंबरला मोर्चा काढण्यात येणार आहे. यासर्वावर विचार राष्ट्रवादीच्या बैठकीत केला जाणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री स्वाभिमान गहाण ठेवलाय - गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमाभागात वाद सुरू आहेत, तिथले मुख्यमंत्री आपल्या राज्याबद्दल अनुउद्गार काढतात, इतकेच नाही तर महाराष्ट्राच्या वाहनांची तोडफोड केली जात आहे. अशामध्ये राज्य सरकारमार्फत कर्नाटकच्या बँकेला व्यवसाय दिले जात आहेत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री स्वाभिमान गहाण ठेवून काम करत असतील तर हे दुर्दैवी आहे. सरकारच्या विद्वत्तेचे कौतुक करावे तितके कमी आहे, अशा शब्दात जयंत पाटील यांनी शिंदे - फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला.