मुंबई - ईडी हे दुधारी शस्त्र आहे. त्यामुळे या शस्त्राचा वापर करताना सत्ताधाऱ्यांनी विचार करावा, असा सूचक इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आज दिला आहे. मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष पवार यांच्यासहित अजित पवार, अन्य अनेक पक्षांचे नेते आणि राज्य सहकारी बँकेच्या संचालकांवर कथित आर्थिक घोटाळ्याप्रकरणी ईडीने गुन्हा नोंद केला आहे. मात्र आपल्या देशात या ईडीचा राजरोसपणे दुरुपयोग सुरू असल्याचेही भुजबळ यांनी सांगितले.
हेही वाचा -अजित पवारांचे आता काय होणार? उलट-सुलट चर्चांना उधाण
भुजबळ म्हणाले, जगभरात भ्रष्टाचारावर जरब बसावी म्हणून हा कायदा केला गेला आहे. पण भारतात त्याची अधिक तीव्रता आहे. भारतात ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले आहेत, ते दहशतवादी म्हणून गणले जाऊ लागले आहेत. कायद्यात मी निर्दोष की गुन्हेगार, ते स्वतः सिद्ध करायचं असा ईडीचा विचित्र कायदा आहे. मात्र, हे कायदे बनवताना आणि वापरताना आपण कायम खुर्चीवर राहणार नाही, याची जाणीव सत्ताधाऱ्यांना असली पाहिजे. विरोधकांवर याचा जसा वापर होतोयं तसा तुमच्यावर देखील होऊ शकतो. त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी हे ईडीचे शस्र वापरताना विचार करावा, असे मत देखील भुजबळ यांनी यावेळी व्यक्त केले.
हेही वाचा - अजित पवारांसह अन्य नेत्यांवर ईडीची कारवाई कायदेशीरच - माधव भांडारी
पवार साहेबांवर असा गुन्हा नोंदवणे हे निषेधार्य आहे. त्यांचा या प्रकरणात काही संबंध नाही. त्यामुळे ईडीचा निषेध महाराष्ट्रातील प्रत्येकानं करायला हवा, अर्थातच निवडणूक आहे म्हणून हे शस्त्र विरोधकांचा आवाज बंद करण्यासाठी वापरलं जात असल्याची टीकाही त्यांनी केली. राज्यात ईडीमार्फत करण्यात येणाऱ्या कारवाईचा जाब एक दिवस सत्ताधाऱ्यांना द्यावा लागेल, असेही भुजबळ म्हणाले.
राज्य सहकारी बँकेच्या (शिखर बँक) कर्ज वाटपातील घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर अंमलबजावणी संचालनालयाद्वारे (ईडी) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच प्रकरणी राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह एकूण ७६ जणांवर याआधीच गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या कारवाईबाबत छगन भुजबळांनी प्रतिक्रिया दिली.