मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर अजित पवार गट सत्तेत सहभागी झाला. उपमुख्यमंत्रीपदी अजित पवार आणि त्यांचे सहकारी मंत्रीपदी विराजमान झाले. शरद पवार आमचे दैवत असून त्यांचा फोटो आम्ही वापरणारच अशी भूमिका अजित पवार गटाने घेतली होती. मात्र अजित पवार गटाने आपला फोटो परवानगीशिवाय वापरू नये अशा प्रकारची ताकीद दिल्यानंतरही अजित पवार गटाकडून शरद पवारांच्या फोटोचा वापर केला जात होता. मात्र आता खुद्द शरद पवारांनी फोटो वापरण्यावरून कोर्टात जाण्याची तंबी दिल्यानंतर, शरद पवार यांचा फोटो वापरू नये अशा प्रकारच्या सूचना, अजित पवार गटाच्या वरिष्ठ नेत्यांकडून कार्यकर्त्यांना देण्यात आल्या आहेत.
फोटो वापरू नका : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्यानंतरही अजित पवार गटाकडे वारंवार शरद पवार यांचा फोटो वापरला होता. शरद पवार आमचे दैवत आहे, दैवताचा फोटो वापरण्यावर कोणाचेही बंधन नसावे अशा प्रकारची भूमिका अजित पवार गटाने घेतली होती. अशाच प्रकारे शिवसेना पक्षात दोन गट पडल्यानंतर शिंदे गटाकडून बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोचा वापर केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हयात असताना त्यांना न विचारता अजित पवार गटाकडून फोटो वापरल्याने, शरद पवारांनी आपले फोटो न वापरण्याची ताकीद दिली होती. परंतु तरी देखील अजित पवार गटाकडून फोटो वापरला गेल्यानंतर शरद पवारांनी कोर्टात जाण्याचा इशारा दिल्यानंतर, सावध भूमिका म्हणून अजित पवार गटाच्या वरिष्ठांकडून कार्यकर्त्यांना शरद पवारांचा फोटो बॅनर आणि इतर प्रसिद्धी पत्रकावरती वापरू नये अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
बीडच्या सभेच्या टीझरमध्ये शरद पवार यांचा फोटो नाही : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सभा महाराष्ट्रभर होत आहेत. अजित पवार गटाने शरद पवारांच्या सभेची धास्ती घेतली असून आता अजित पवार गटाकडून देखील प्रतिउत्तर सभा घेतल्या जाणार आहेत. त्याची सुरुवात बीड येथून होणार आहे. 27 ऑगस्ट रोजी अजित पवार गटाकडून अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत सभा होणार आहे. बुधवारी बीड येथील युवा नेते योगेश क्षीरसागर यांच्यासह 35 नगरसेवक, 5 जिल्हा परिषद सदस्य आणि 29 सरपंचांनी अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. कार्यक्रमाच्यावेळी लावण्यात आलेल्या बॅनरवरून देखील राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा फोटो गायब झाल्याचे चित्र पाहायला मिळाले होते.
हेही वाचा -