मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी दिल्लीत काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधींची भेट घेतली. मात्र, या भेटीदरम्यान राज्यात सत्ता स्थापनेचा कोणताही विषय झाला नाही आणि त्यात काही ठरलेले नाही, असे शरद पवार म्हणाले. राज्यात शेतकरी खूप मोठ्या संकटात सापडले आहेत. त्यांना तातडीने मदत मिळाली पाहिजे, त्यांचे अश्रू पुसले पाहिजेत, म्हणून मी उद्यापासून राज्यभर फिरणार आहे, असे ते म्हणाले.
हेही वाचा - सत्ता संघर्षाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री सरसंघचालक मोहन भागवतांच्या भेटीला
१० तारखेनंतर पुन्हा सोनिया गांधी यांच्याशी भेटणार असल्याची माहिती शरद पवार यांनी आज माध्यम प्रतिनिधींशी मुंबईत दिली. दिल्लीहून परतल्यानंतर पवार यांनी सायंकाळी सिल्वर ओक बंगल्याजवळ माध्यम प्रतिनिधींशी बोलताना ही माहिती दिली.
सोनिया गांधी यांच्याशी भेट झाली, मात्र त्यात काहीही ठरले नाही. बाकी कोणी काही चर्चा करत असेल ते मला माहीत नाही, मी उद्यापासून राज्यात दौऱ्यावर चाललो आहे. राज्यात सत्ता स्थापनेसाठी सेना-भाजप हे एकत्र आहेत, त्यांनी लवकरात-लवकर धोरण ठरवावे. त्यासाठी आम्ही त्यांच्या निर्णयाची वाट पाहत आहोत, असेही पवार म्हणाले.
हेही वाचा - युतीला लायकीपेक्षा जास्त जागा मिळाल्यामुळे ही परिस्थिती - राजू शेट्टी
राज्याच्या दौऱ्यावरून मी 10 तारखेला मुंबईत येईन, त्यानंतर सोनिया गांधी यांच्याशी भेट होईल, तेव्हा काय ते चित्र स्पष्ट होईल असेही पवार म्हणाले.